औरंगाबाद : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास आजही भाजपची सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून समाचार घेण्यात आला आहे. हे शहाणपण आधी का सुचलं नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी विचारला आहे, तर मुनगंटीवारांना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पडत आहेत, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी लगावला (NCP Congress on Sudhir Mungantiwar) आहे.
भाजपची इच्छा असली, तरी शिवसेना त्यांच्यासोबत जाईल की नाही, हे शिवसेनेला विचारलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी ‘टीव्ही9 मराठी’कडे व्यक्त केली. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. जे शहाणपण आता सुचतंय, ते आधी का सुचलं नाही? असा प्रश्नही मलिक यांनी विचारला आहे. भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे मुनगंटीवारांनी हे वक्तव्य केल्याचं मलिक म्हणाले.
‘कमळाबाई’ला शिवसेनेने सोडलं आहे. भाजपची इच्छा आहे, ‘मी येतो-येतो’. पण आता शिवसेनेच्या हातात आहे, त्यांना सोबत घ्यायचं की नाही. ते निर्णय घेतील, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ‘सुधीर मुनगंटीवार यांना मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्याची इच्छा आहे’ असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला. ‘सुधीर मुनगंटीवार यांच्या बोलण्याला काही अर्थ राहत नाही. आमचं तीन पक्षाचं सरकार स्थापन झालंय आहे. आमचं चांगलं चाललंय. मुनगंटीवारांना वाटतं तसं काही होण्याची सुतराम शक्यता नाही. तिन्ही पक्षाचं सरकार महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काम करतंय’ असं अशोक चव्हाण म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले होते?
शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही, ‘देर आये दुरुस्त आये, सुबह का भुला श्याम को आया’ आम्ही असं समजू, असं विधान भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. मुनगंटीवार नांदेडमध्ये बोलत होते.
मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्ताव देखील मनसेकडून आलेला नाही. पण समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची भूमिका असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले.
मुंबईच्या शक्तिशाली ‘मातोश्री’चा शक्तीपात झाला आणि दिल्लीची मातोश्री शक्तिशाली झाली असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जहरी टीकाही केली. “शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा म्हणजे 21 व्या शतकातील आश्चर्य आहे. अशोक चव्हाण म्हणाल्याप्रमाणे फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुस्लिमांच्या सांगण्यावरुन ते सत्तेत गेले.” असंही मुनगंटीवार म्हणाले होते.
सरकारची परिस्थिती व्हेंटिलेटरवरच्या रुग्णासारखी आहे. सरकार किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही. भिन्न विचाराचे सरकार दीर्घकाळ टिकत नसल्याचा इतिहास आहे. हे तीन पक्ष रागापोटी एकत्र आले आहेत. तेव्हा काय होईल हे सांगता येणार नाही, अशी टीकाही मुनगंटीवारांनी केली होती. (NCP Congress on Sudhir Mungantiwar)