मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) एकनिष्ठ राहिलेल्या तटकरे कुटुंबात धुमसणारा काका-पुतण्याचा वाद शिगेला पोहचला आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांचा पुतण्या आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे (Avadhut Tatkare) पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या तीन सप्टेंबरला अवधूत तटकरे हातावरचं ‘घड्याळ’ सोडून ‘शिवबंधन’ बांधणार आहेत.
काका-पुतण्याचा वाद महाराष्ट्रातील राजकारणात नवीन नाही. क्षीरसागर कुटुंबापाठोपाठ तटकरे कुटुंबातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादीसोबतच तटकरे कुटुंबालाही भगदाड पडलं आहे. सुनिल तटकरेंचे बंधू अनिल तटकरे यांचे पुत्र अवधूत तटकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत नाराजी उघड केली आहे. गेल्या दिवसांपासून अवधूत यांच्या ‘मातोश्री’वर वाऱ्या सुरु होत्या. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत तीन तारखेला सेनाप्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
सुरुवातीला, केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगणाऱ्या अवधूत तटकरे यांनी राजकीय चर्चा झाल्याचं मान्य केलं. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय जाहीर करणार असल्याचं अवधूत आधी म्हणाले होते. पण त्यानंतर अवधूत तटकरे सेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आलं.
राष्ट्रवादीला भगदाड
याआधीच अनेक आमदार सोडचिठ्ठी देऊन युतीच्या वळचणीला गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे. कालच राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आणखी एक आमदार शिवसेनेच्या गळाला लागला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
काय आहे वाद?
अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे संबंध तणावाचे असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः तटकरे कुटुंबीयांच्या या भांडणात हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता, पण याला फार यश आलं नाही. 2016 मध्ये अवधूत तटकरेंच्या धाकट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता.
सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत यांनी स्वतःची तयारी सुरु केली असल्याचं दिसत आहे.
याआधी खासदार सुनिल तटकरेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र तटकरेंनी हे दावे फेटाळून लावले होते.
कोण आहेत अवधूत तटकरे?
आमदार अवधूत तटकरे हे कुटुंबातील एक मोठं प्रस्थ आहे. श्रीवर्धनचे आमदार, रोह्याचे माजी नगराध्यक्ष, प्रशासन आणि पक्षात दबदबा असणारं आक्रमक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख. सुनिल तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून अवधूत यांच्याकडे पाहिलं जातं. अवधूत यांच्या प्रचारापासून आदिती आणि अनिकेत तटकरे दूर राहिले.
अवधूत तटकरेंची आक्रमकता आणि राजकीय महत्त्वाकांक्षा मात्र सुनील तटकरे यांच्यासाठी कायमच अडचणीची ठरत आली. आमदार म्हणून निवडून आल्यावर अवधूत तटकरे रोह्याचं नगराध्यक्षपद सोडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र त्यांनी नगराध्यक्षपद सोडलं नाही. अखेर नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या. त्यामुळे अवधूत तटकरे यांनी पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून अवधूत हे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमापासून अलिप्त राहिले आहेत.
शिवसेनेचं ‘या चिमण्यांनो परत फिरा रे…’
लोकसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादीच्या गोटात गेलेले धनराज महाले (Dhanraj Mahale) शिवसेनेत परतले. तर बहुजन विकास आघाडीचे बोईसरमधील आमदार विलास तरे (Vilas Tare) यांनीही पुन्हा शिवबंधन बांधलं. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनीही घरवापसी केली आहे. आता हा तिसरा आमदार शिवसेनेत येत आहे.
भास्कर जाधव यांनीही राष्ट्रवादीतून शिवसेनेत परतण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. तर छगन भुजबळही शिवसेनेत पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा आहेत. मध्यंतरी, खासदार सुनिल तटकरेही राष्ट्रवादीचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात होतं. तर खासदार उदयनराजेही राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपच्या वळचणीला जाण्याच्या चर्चा होत्या. रामराजे निंबाळकर यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी युतीत प्रवेश केला, तर राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे उलटे फिरतील.
राष्ट्रवादीला खिंडार, युतीमध्ये इनकमिंग
राष्ट्रवादी ते भाजप : शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik), राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh), राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) आणि विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांनी भाजपच्या तंबूत प्रवेश केला होता.
काँग्रेस ते युती : काँग्रेसमध्ये असलेले सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी भाजपची वाट धरली. काँग्रेसकडून नऊ वेळा खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी भाजप, तर कन्या आणि काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.