नंदकुमार गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर निकाल दिला आहे. नार्वेकर यांनी अजित पवार यांचाच राष्ट्रवादी पक्ष मूळ असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवून दोन्ही गटाला मोठा दिलासा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हातून पक्ष गेल्यानंतर पक्षात चलबिचल सुरू झाली आहे. निकाल आल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या निकालावर सर्वात पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कायदाची पायमाल्ली कशी करावी आणि सोयीनुसार कसा निकाल द्यावा हे विधानसभा अध्यक्षांकडून शिकलं पाहिजे. राज्यातील राजकारणाचं वाट्टोळं करणारा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे, असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. आव्हाड हे मीडियाशी संवाद साधत होते.
दोन्ही गटाकडून आव्हान देणाऱ्या याचिका आल्या आहेत. दोघांच्या निवडणुकाही वेगवेगळ्या तारखांना झालेल्या आहेत. तेव्हा वाद उरतोच कुठं? 1 सप्टेंबर 2022 रोजी शरद पवार यांची निवड झाली होती. निकाल देताना सुभाष देसाई यांच्या केसचा सोयीनुसार वापर करण्यात आला, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
10 व्या शेड्युलकडे मी सृक्ष्म दृष्टीकोणातून पाहतो असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले. सिस्टिम लावण्यासाठी दहाव्या शेड्यूलचा वापर करता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. आयाराम गयाराम यांना रोखण्यासाठी दहावं शेड्यूल आहे. निर्णय द्यायला दीड दीड वर्षे लावता आणि नंतर सांगता दहावं शेड्यूल माझ्याकडे येतच नाही. दीड वर्षे अंडी उबवत होता का?, असा सवाल त्यांनी केला.
30 जूनला झालेली अध्यक्षपदी निवड ही असंवैधानिक आहे असं निवडणूक आयोगाने सांगितलं. समृद्धी महामार्गाचा ब्रिज तुटला तेव्हा अजित पवार यांना विचारलं तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? त्यावर त्यांनी म्हटलं की तुम्हाला माहिती नाही का? शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. एवढं सगळं यांना दिसलं नाही? तुम्ही काय धृतराष्ट्रच्या भूमिकेत आहात काय?, असा सवाल त्यांनी केला.