मुंबई : बेपत्ता असल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल झालेले राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांच्याशी संपर्क झाला आहे. कुटुंब आणि समर्थकांना आपली काळजी न करण्याचं आवाहन करणाऱ्या नितीन पवार (NCP MLA Nitin Pawar found) यांनी दिलेलं उत्तर कोड्यात टाकणारं आहे. नाशिमधील कळवणमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर नितीन पवार निवडून आले आहेत.
‘मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो. माझी काळजी करु नका, अशी कुटुंबीय आणि इतरांना विनंती आहे. मी शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ, राष्ट्रवादी पक्षासोबत आहे. माझ्या कुटुंबाने इतर कोणताही विचार करु नये. कोणताही गैरसमज करुन घेऊ नये.’ असं नितीन पवार यांनी म्हटलं आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे. परंतु ‘शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत’ असा एकत्रित उल्लेख नितीन पवार यांनी केल्यामुळे नेमकं गौडबंगाल कळेनासं झालं आहे.
नितीन पवार वगळता राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांशी पक्षाचा संपर्क झाला होता. विशेष म्हणजे सर्वच आमदारांनी आपण ‘साहेब’ शरद पवार आणि राष्ट्रवादीसोबत असल्याचं सरळ उत्तर दिलं होतं. मात्र नितीन पवार यांचं उत्तर कचाट्यात टाकणारं आहे. अजित पवारांनी बंड पुकारल्यामुळे अजित पवार गट आणि राष्ट्रवादी अशी सरळ विभागणी झाली होती. परंतु नितीन पवार यांचं मोघम उत्तर चक्रावून टाकणारं आहे.
NCP MLA Nitin Pawar, for whom a missing person’s complaint was filed: I request my family and the people to not worry about me. I am with Sharad Pawar, Ajit Pawar and Chhagan Bhujbal. Nothing otherwise should be thought, by my family and people. #Maharashtra pic.twitter.com/cvKX7mT2j7
— ANI (@ANI) November 24, 2019
नितीन पवार शनिवारी (23 नोव्हेंबर) पक्षाच्या बैठकीला जात असल्याचे सांगून गेले ते परत आलेच नव्हते. तसेच त्यांच्याशी घरच्यांचा संपर्कही होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या मुलाने पंचवटी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
या चिमण्यांनो परत फिरा रे…
राष्ट्रवादीचे आमदार एकामागून एक परतीच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. जळगावमधील अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याच्या भावना फेसबुकवरुन व्यक्त केल्यानंतर अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनीही आपण पवारांसोबत असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर शहापूरमधील आमदार दौलत दरोडा यांनीही शरद पवारांसोबतच असल्याचं स्पष्ट केलं. त्यामध्ये नितीन पवार यांच्या रुपाने आणखी एका आमदाराची भर पडली आहे.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेत मनधरणीचे प्रयत्न केले. परंतु दोघांनाही अपयश आल्याचं समोर आलं.