नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मिशन डॅमेज कंट्रोल सुरु करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही अनेक आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात नसल्याची (Missing NCP MLA Nitin Pawar) माहिती मिळत आहे. त्यातच आता नाशिमधील कळवणचे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार बेपत्ता (Missing NCP MLA Nitin Pawar) झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत रितसर तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार अद्यापही संपर्कात नसल्याने शरद पवारांच्या काळजीत भर पडली आहे. या सर्व आमदारांशी संपर्क साधण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आता आमदारांच्या कुटुंबीयांकडूनच थेट तक्रार दाखल होऊ लागल्याने आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. आमदार नितीन पवार शनिवारी (23 नोव्हेंबर) पक्षाच्या बैठकीला जात असल्याचे सांगून गेले ते परत आलेच नाही. तसेच त्यांच्याशी घरच्यांचा संपर्कही होत नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाने पंचवटी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
शनिवारी (23 नोव्हेंबर) अचानक झालेल्या या सत्तानाट्याच्या वैधतेला दोन पातळीवर आव्हान असणार आहे. एक आव्हान विधीमंडळाच्या पटलावर बहुमत सिद्ध करण्याचे आहे. तर दुसरे आव्हान थेट सर्वोच्च न्यायालयात मिळणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या निर्णयाला आणि भाजपच्या सत्तास्थापनेच्या वैधतेला आव्हान दिले आहे. याची सुनावणी आज (24 नोव्हेंबर) सकाळी 11.30 वाजता होणार आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे हे बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून जोरदार फोडाफोडीचे प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भाजपला बहुमत चाचणीत पराभूत करु, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. यापुढील काळात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून साम, दाम, दंड, भेद यांचा उपयोग करुन आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे.