सोलापूर : या देशातल्या प्रत्येकाला मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे विद्यमान आमदार रमेश कदम आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी दिली.
वाचा – सोलापूर लोकसभा : विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट?
रमेश कदमांच्या या इच्छेमुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना-भाजप युती न झाल्यास राष्ट्रवादीचे मोहोळचे विद्यमान आमदार रमेश कदम सोलापूर लोकसभा निवडणूक शिवसेनेकडून लढविण्यास इच्छुक आहेत. तसेच विधानसभेला भाजप-शिवसेना युती झाल्यास आमदार रमेश कदम मोहोळ विधानसभा लढवतील, अशी इच्छाही कदम यांनी व्यक्त केल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केला. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना आता रमेश कदम यांचाही सामना करावा लागणार का असा प्रश्न उपस्थित झालाय.
काय आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातलं चित्र?
2014 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात काँग्रेसचा धुव्वा उडालेला असताना इकडे मोदींच्या त्या सुनामीचा चांगलाच प्रभाव पडला. आपल्या कुंडलीत पराभव नसल्याचं छातीठोकपणे सांगणाऱ्या शिंदेंच्या कुंडलीत मोदी लाटेचा शनी आला आणि त्याच्या प्रभावाने 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात कधी न पाहिलेल्या पराभवाला शिंदे सामोरे गेले. त्यावेळी देशभरात मोदी नावाचं वादळ घोंगावत असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्याचा फारसा परिणाम जाणवत नव्हता. इतकंच काय, भाजपच्या उमेदवाराचा सुद्धा पत्ताच नव्हता. ऐनवेळी भाजपने नवख्या असलेल्या शरद बनसोडेंना बोहल्यावर बसविले. त्यामुळे शिंदेंच्या विजयाचा घोडा पुढे जाईल असं चित्र असतानाच निकालानंतर शिंदेंना धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं.
सहा विधानसभा मतदारसंघातलं चित्र
सोलापूर लोकसभा मतदार संघात असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसची सत्ता असून तिथे प्रणिती शिंदे या आमदार आहेत.
शहर उत्तर मतदारसंघात भाजपची सत्ता असून पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे इथले आमदार आहेत.
शहर दक्षिणमध्ये भाजपची सत्ता असून सहकार मंत्री सुभाष देशमुख हे इथले आमदार आहेत.
मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादीची सत्ता असून रमेश कदम हे इथले आमदार आहेत.
अक्कलकोट मतदारसंघात काँग्रेसची सत्ता असून सिद्धाराम म्हेत्रे हे इथले आमदार आहेत.
पंढरपूर मतदारसंघात काँग्रेसची सत्ता असून भारत भालके हे इथले आमदार आहेत.