उस्मानाबाद : एकापाठोपाठ एक राष्ट्रवादीच्या आमदारांना युती प्रवेशाचे वेध लागल्याचं दिसत आहे. उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील (NCP Rana jagjitsinh patil) आणि माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (Dr. Padmasinh Patil) भाजपचा झेंडा हाती घेण्याचे संकेत आहेत. ‘मला तुमच्याशी काही बोलायचंय’ अशा आशयाचे फलक लावून जगजीतसिंह पाटलांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची तयारी केलेली दिसत आहे. शरद पवार यांचे विश्वासू आणि निष्ठावंत सहकारी मानल्या जाणाऱ्या पाटील यांनी पक्ष सोडल्यास मराठवाड्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जाईल.
खुला संवाद साधण्यासाठी जगजीतसिंह पाटील यांनी 31 ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. ‘दादा… नवी दिशा, नवी आशा… मला तुमच्याशी काही बोलायचंय!! परिवार संवाद, आवर्जून उपस्थित राहा’ असे फलक लावण्यात आले आहेत. यावर पाटील पितापुत्रांचे फोटो आहेत. पक्ष सोडण्यापूर्वी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आणि शक्तीप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना बोलावलं आहे. यावेळी ते भाजप प्रवेशाची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. राणा जगजीतसिंह पाटील हे राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा गेल्या एक महिन्यापासून होती. पाटील परिवाराने राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ फिरवल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडाडून टीका केली होती. ज्यांनी मंत्रीपदे भोगली व ज्यांच्या नावावर पक्षाचा सात बारा उतारा होता ते फितुरी करून पक्ष बदलत असतील तर त्यांचा पराभव करा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं होतं.
भाजपमध्ये पुढच्या मेगाभरतीचा मुहूर्त ठरला आहे. एक आणि पाच सप्टेंबरला पुढची मेगाभरती होणार असल्याची माहिती आहे. याचवेळी पाटील पितापुत्र भाजपप्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वीच राष्ट्रवादीचे आणखी एक संस्थापक सदस्य मधुकर पिचड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कोण आहेत डॉ पद्मसिंह पाटील?
-शरद पवारांचे निकटचे नातेवाईक, शरद पवारांनी ज्या ज्या वेळी पक्ष बदलला त्यावेळी सोबत
-राज्याचे माजी गृहमंत्री. त्याचबरोबर ऊर्जा-पाटबंधारे अशी अनेक महत्त्वाची खाती उपभोगली
– 1978 मध्ये काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा आमदार व थेट राज्यमंत्री
1978 ते 2009 पर्यंत सलग सात वेळेस 31 वर्ष उस्मानाबाद मतदारसंघातून आमदार, जिल्ह्यात आजवर सर्वाधिक जास्त सात वेळेस आमदार. 37,939 मतांनी विजयी होण्याचा रेकॉर्ड
2004 मध्ये विधानसभेत पवनराजे निंबाळकर यांच्याशी झालेल्या अटीतटीच्या लढाईत 484 मतांनी विजय
2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभेचे खासदार मात्र अवघ्या 6787 मतांनी विजयी
2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दोन लाख 35 हजार 325 मतांनी पराभूत
3 जून 2006 रोजी नवी मुंबई येथील कळंबोली येथे पवनराजे हत्याकांड
6 जून 2009 रोजी विद्यमान खासदार असताना हत्याकांड प्रकरणी सीबीआयकडून मुख्य आरोपी म्हणून अटक
न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगात भ्रष्टाचारात दोषी सापडल्याने मंत्रीपदाचा राजीनामा
25 सप्टेंबर 2009 पासून डॉ पाटील हत्याकांडात जामिनावर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट व सुपारी दिल्याप्रकरणी आरोपी
मुलगा राणांचे राजकीय पुनर्वसन करुन सक्रिय राजकारणापासून अलिप्त
राणा जगजीतसिंह पाटील यांनी दोन वेळा विधानपरिषदेचं आमदारपद भूषवलं आहे. वयाच्या 32 व्या वर्षी मंत्रिपदी विराजमान झालेले ते सर्वात युवा नेते ठरले होते. उद्योग, महसूल, कृषी, सांस्कृतिक कार्य, रोहयो, संसदीय कार्य या मंत्रालयांचे राज्यमंत्री होते. 2014 मध्ये ते उस्मानाबाद जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आले होते.
गेल्या 40 वर्षांपासून उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात पद्मसिंह पाटील आणि राणा जगजीतसिंह पाटील यांची सत्ता आहे. पद्मसिंह पाटील यांनी आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं आहे. ते विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आहेत.
राणा जगजीतसिंह पाटील आणि पद्मसिंह पाटील हे पवार कुटुंबाचे नातलग आहेत. त्यांची पत्नी अर्चना पाटील उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत.
मतदारसंघ अदलाबदलीची शक्यता
राणा जगजीतसिंह पाटील भाजपमध्ये आले तर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांना अडचण येऊ शकते. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे जागेची अदलाबदली करावी लागू शकते.
राष्ट्रवादीला भगदाड
याआधीच अनेक आमदार सोडचिठ्ठी देऊन युतीच्या वळचणीला गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर आणखी एक आमदार भाजपच्या गळाला लागला आहे.
राष्ट्रवादीला खिंडार, युतीमध्ये इनकमिंग
राष्ट्रवादी ते भाजप : शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik), राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh), राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.