मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची भेट घेतली. रोहित पवार चक्क प्रवीण दरेकर यांना भेटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोन्ही नेत्यांची आज सकाळी भेट झाली. भेटीच नेमकं कारण अजून गुलदस्त्यात आहे. प्रवीण दरेकर यांचं सरकारी निवासस्थान अवंती इथे जाऊन रोहित पवार यांनी ही भेट घेतली. (NCP MLA Rohit Pawar meet BJP opposition leader Pravin Darekar today)
प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे संचालक आहेत. रोहित पवार यांचं त्यासंबंधित काही काम होतं का असा प्रश्न आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संबंध राज्याला माहिती आहेत. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
अशा परिस्थितीत रोहित पवार यांनी थेट विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतल्याने अनेक तर्क लढविले जात आहेत. तसे पाहता रोहित पवार हे विविध पक्षातील नेत्यांना भेटत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा देशाला माहिती आहे. त्याचीही प्रचिती यानिमित्ताने आली आहे. रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांनी या मतदारसंघातील विकासकामांच्या निमित्ताने राजकारण्यांसोबत सेलिब्रिटींच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या.
“सचिन वाझे यांच्या अंबानी स्फोटकप्रकरणातील सहभागामुळे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली आहे. ठाकरे सरकारने पोलिस दलात बदलांचा बाजार मांडला आहे”, अशी टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
राज्यात ठाकरे सरकार आल्यानतंर कॉरंटाईन सेंटरपासून हॉस्पिटलमध्ये बलात्कार, विनयभंगाचे प्रकार घडले. महिलांवर अत्याचार राज्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. खून, दरोडे होत आहे. वाझे सारखा खाकी वर्दी माणूस अनेक प्रकरणात समावेश आहे. या सरकरमध्ये कोणतेही नियंत्रणा नसून पोलीस दलाची बदनामी झाली असून याला सर्वस्वी राज्यसरकार जबाबदार आहे असा हल्लाबोल प्रविण दरेकर यांनी केला होता.