औरंगाबाद : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे,” असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना (Rohit pawar on Sharad pawar Pm) केलं. “सध्या राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे. त्यामुळे आगामी लोकसभाही महाविकासआघाडीने एकत्र लढविली पाहिजे,” असेही रोहित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांच्या सेवा गौरव समारंभानिमित्त आज (4 फेब्रुवारी) औरंगाबादेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी शरद पवारांच्या पंतप्रधानपदावर भाष्य केलं.
“तुमचं, माझं, आपल्या सर्वांचं एक स्वप्न आहे. 2024 ला लोकसभा आहे. शरद पवार अजूनही तरुण आहेत. त्यामुळे आपण एकत्र येऊ, पुन्हा एकत्र निवडणुका लढू. महाराष्ट्रात महाविकासआघाडी झाली, त्यामुळे आता हे सोपं झालं आहे. लोकसभेतही आपण एकत्र येऊन लढलो तर एक मराठी माणूस त्याठिकाणी (पंतप्रधानपदी) जर गेला, तर आपण सर्वांनी बघितलेले ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं,” असे रोहित पवार (Rohit pawar on Sharad pawar Pm) म्हणाले.
“विश्वास असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि शरद पवारांवर लोकांचा विश्वास आहे. शरद पवार जेव्हा कुठेही जातात, त्यावेळी सर्व सामन्यांना काय पाहिजे हे समजून घेतात. साहेबांचा लोकांवर विश्वास आहे. लोकांचा साहेबांवर विश्वास आहे,” असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.
यावेळी रोहित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला. “जर एखाद्या नेत्याचा लोकांवर विश्वास नसेल तर त्या नेत्याला एखाद्या पत्रकाराशी बोलताना सुद्धा आपले बूट हातात घ्यावे लागतात. त्यामुळे अशाप्रकारचा विश्वास आपल्याला नको आहे. आपल्याला खरा विश्वास पाहिजे की आपली लोकं आपल्यासोबत आहेत,” असेही रोहित पवार (Rohit pawar on Sharad pawar Pm) म्हणाले.