रत्नागिरी : राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम (MLA Sanjay Kadam) यांना 2005 मधील तोडफोड प्रकरण चांगलंच भोवताना दिसतंय. कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना खेड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची रवानगी आता रत्नागिरीच्या जिल्हा कारागृहात होणार आहे. ते शिवसेनेत असताना 2005 मध्ये खेड येथे आलेल्या अतिवृष्टीत बाधित झालेल्या बाजारपेठेतील लोकांची भेट घेतली होती आणि त्यावेळी खेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या ठिकाणी तत्कालीन प्रांताधिकारी प्रवीण गेडाम कार्यरत होते. प्रवीण गेडाम आणि संजय कदम यांच्यात तेव्हा वाद झाला होता.
या वादानंतर संजय कदम यांनी कार्यालयाची तोडफोड केली. त्याप्रकरणी प्रवीण गेडाम यांनी खेड पोलिसात गुन्हा देखील दाखल केला होता. याप्रकरणी 2015 मध्ये खेड दिवाणी न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा कदम यांना सुनावली. या शिक्षेविरोधत कदम यांनी खेडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
खेड दिवाणी न्यायालयाचा निर्णय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे याप्रकरणी खेड पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार कदम यांना ताब्यात घेतलं. त्यांची रवानगी आता रत्नागिरीच्या कारागृहात करण्यात आली आहे. संजय कदम हे अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत.
व्हिडीओ :