जळगाव : “जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यातील संतांकडून वशीकरण मंत्र घेतला आहे. या मंत्रानेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना वश केले असून ते सांगतील तेवढेच मुख्यमंत्री बोलतात”, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील (NCP MLA Satish Patil) यांनी केला. मात्र आपल्याकडेही असा मंत्र आहे. गिरीश महाजनांना यावेळी पाडल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या जिल्हा बैठकीत आमदार डॉ. सतीश पाटील यांनी गिरीश महाजनांवर हल्ला चढवला. “जिल्ह्यातील एक नेता रोज राष्ट्रवादीला डिवचतोय. त्याला हरविणे हे आपले पहिले लक्ष्य राहणार आहे. गिरीश महाजनांना यावेळी पाडल्याशिवाय राहणार नाही” असं डॉ. पाटील यांनी जाहीर केले.
राज्यात सध्या पडझड सुरू आहे. रोज कुठला तरी नेता जातो आणि कार्यकर्ते सुन्न होतात. 37 दिवसांनी विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. भाजपावाले सांगतात त्याप्रमाणे 13 सप्टेंबरपासून आचारसंहीता जाहीर होण्याची शक्यता आहे. कोण कुठून लढेल हे पार्लमेंटरी बोर्ड ठरविणार आहे. पक्षात आजही झारीतले शुक्राचार्य आहेत. स्वत:चं घर शाबूत ठेवण्यासाठी सगळ्यांना एक व्हावे लागणार असल्याचे आ. डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.