जळगाव: राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) गळती सुरू असली तरी काही नेते मात्र आजही पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिल्याचं पाहायला मिळत आहे. असाच प्रकार जळगावमध्ये पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील (NCP MLA Satish Patil) यांनी आज (3 ऑक्टोबर) मोठे शक्तीप्रदर्शन करत पारोळा-एरंडोल मतदारसंघातून (Parola Erandol Constituency) आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आलो नाही, तर वडिलांचं नाव लावणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा केली.
आमदार सतीश पाटील यांनी भव्य मिरवणूक काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली आहे. याठिकाणी मागील निवडणुकीत डॉ. सतीश पाटील यांनी विजय मिळवला होता. ते जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत.
पारोळा एरंडोल हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे सतीश पाटील यांची लढत शिवसनेच्या उमेदवारांसोबत होईल. पारोळ्यात भाजपची देखील ताकद आहे. पारोळ्याचं नगराध्यक्ष पद भाजपकडे आहे. एरंडोल येथेही भाजप कार्यकर्ते सक्रिय आहेत. केंद्र आणि राज्यात सत्तेत असल्याने एरंडोलमध्ये अनेक कामंही झाली आहेत. त्यामुळे भाजपकडे झुकणाराही एक वर्ग येथे आहे.
माजी खासदार ए. टी. पाटील यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्याने ते सध्या शिवसेना-भाजपच्या विरोधात असल्याचं चित्र आहे. आता विधानसभा निवडणुकीत एरंडोलमध्ये ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. मागील निवडणुकीत देखील मोदी लाट असताना मी निवडून आलो होतो. त्यावेळी येथील लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता. तो यावेळी पाहायला मिळेल, असं मत सतीश पाटील यांनी व्यक्त केलं आहे.