मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नवनियुक्त विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाआघाडीच्या नेत्यांसह राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. यासंबंधित 160 आमदारांचा पाठिंबा देणारं सह्यांचं पत्र देखील राजभवनातील सचिवांकडे देण्यात आलं आहे. मात्र, या पाठिंबा पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांच्या सह्या नसल्याचं स्वतः जयंत पाटील यांनीच कबूल केलं आहे (NCP MLA who not sign). त्यामुळे हे तीन आमदार कोण याविषयी प्रश्न विचारण्यात येत आहे.
विशेष म्हणजे जयंत पाटील यांना पत्रकारांनी पाठिंब्याच्या सह्या नसलेले ते तीन आमदार कोण असा थेट प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्वतः या नावांचा खुलासा केला. राज्यपालांना दिलेल्या पाठिंबा पत्रावर आमदार अण्णा बनसोडे, आमदार धर्मारावबाबा आत्रम आणि स्वतः अजित पवार यांच्या सह्या नाही, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
जयंत पाटील म्हणाले, “आज (25 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता शिवसेनेचे विधीमंडळ नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी आणि आम्ही सर्व नेत्यांनी राज्यपालांना 160 आमदारांच्या सह्या असलेलं पत्र दिलं आणि सत्तास्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं सरकारने शपथ घेतली असली तरी त्यांच्याकडं संख्याबळ नाही. हे त्यांनी आधीच राज्यपालांच्या आमंत्रणानंतर सांगितलं होतं. आजही त्यांच्याकडं संख्याबळ नाही. ते बहुमत सिद्ध करु शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही सर्व पक्षांनी मिळून सत्तास्थापनेचा दावा केला.
आम्ही राज्यपालांकडे तात्काळ सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याची मागणी केली. विधीमंडळात आमदारांची मोजणी झाली, तर त्यांच्याकडे बहुमत नाही हे आपोआप सिद्ध होईल. आम्ही सर्व पक्षांनी मिळून 162 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं आहे. त्याचा सन्मान करुन राज्यपाल आम्हाला सरकार स्थापनेचं आमंत्रण देतील, अशी आम्हाला आशा आहे, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.
“बहुमत सिद्ध करता आलं नाही तर भाजप काहीही करेल”
बहुमत चाचणीत पराभूत झाल्यानंतर भाजप काहीही करु शकतो, अशी भीती देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करता आलं नाही, तर ते काहीही करु शकतात. त्यामुळे आम्ही सरकार स्थापनेबाबतची तयारीची नोंद व्हावी म्हणून पाठिंबा पत्र राज्यपालांना सादर करुन ठेवलं आहे. आमच्याकडे 51 आमदारांचा पाठिंबा आहे. त्या आमदारांच्या सह्याचं पत्रही आमच्याकडे आहे.”