नवी दिल्ली : उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) आशिर्वादाने मुख्यमंत्री आहेत असं रोखठोक भाष्य करणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तमपणे काम करत आहेत. पण उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन अकारण मित्र पक्षावर टीका होत असेल तर ही गोष्ट पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, एव्हढंच ते विधान होतं. महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या सर्वांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली आहे आणि त्याला अकारण स्वार्थासाठी नख लावणे योग्य नाही. उगाच आता त्या विधानाचा राईचा पर्वत करण्याची आवश्यकता नाही”, असं अमोल कोल्हे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
नारायण गाव खेड बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरुन अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आढळरावांच्या टीकेला उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी विसरु नका, उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर शरद पवारांचा हात, त्यामुळेच ते मुख्यमंत्री आहेत, असा इशारा आढळरावांना दिला होता.
त्याबाबत आज स्पष्टीकरण देताना अमोल कोल्हे म्हणाले, “या मुद्द्याला फार महत्व देण्याची गरज नाही. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगलं काम करत आहे. अशा स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांना एवढं महत्व द्यावं याची आवश्यकता मला भासत नाही. पण याची चर्चा घडावी आणि महाविकास आघडीमध्ये धुसफूस आहे अशी चर्चा घडावी यासाठी अनेक जण आतूर आहेत. नाहीतर हा अत्यंत स्थानिक पातळीवरचा वाद आहे, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
संसदेत मी ठामपणे महाराष्ट्राची बाजू मांडतो आणि उद्धव ठाकरेंविषयी आमच्या मनात आदर आहे. त्याला ठोस कारणही आहे. कारण कोव्हिडच्या काळात ज्या सुसंस्कृत पद्धतीने, संयमीपणाने, ते महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जात आहेत, त्याचं आम्हाला कौतुक आहे, अभिमान आहे. पण उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन अकारण मित्र पक्षावर टीका होत असेल तर ही गोष्ट पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एवढंच ते विधान होतं. कुणी ते विधान ऐकलं, कुणी नाही ऐकले कुणी त्याचा काय अर्थ काढला, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी प्रामाणिकपणे जी वस्तूस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला, असं अमोल कोल्हे म्हणाले.
माझा काय आढळरावांच्या बांधाला बांध नाही. माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणताही आकस नाही. त्यांच्या वयाचा मान ठेवणे ही आपली संस्कृती आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा मतदारसंघाच्या हितासाठी मी नक्कीच योग्य भूमिका घेणार, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.
संबंधित बातम्या
काँग्रेसमुळे सत्तेत आहात विसरु नका, शिवसेना-राष्ट्रवादीच्या खेचाखेचीत काँग्रेसची उडी