सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माढ्याचा तिढा कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये बैठक बोलावली आणि भाजपात जाणार असल्याचं जाहीर केलं. विजयसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे. कार्यकर्त्यांसमोर त्यांनी ही घोषणा केली.
सध्या माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील आणि प्रभाकर देशमुख या दोघांची नावं चर्चेत आहेत. माढ्यातून लढण्यासाठी शरद पवार यांनी माघार घेतली होती. त्यानंतर मोदी लाटेतही निवडून आलेल्या विजय सिंह मोहिते पाटलांच्या चिरंजीवानेच भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय.
रणजितसिंह मोहिते पाटलांचा उद्याच भाजप प्रवेश
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी जाहीर न झाल्याने मोहिते पाटील गट नाराज आहे. यासाठीच आज अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर आज निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकतो. रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजप उमेदवारी देण्यास तयार आहे. भाजप प्रवेशापूर्वी समर्थकांशी चर्चा करण्यासाठी आज मोहिते पाटलांनी बैठक बोलावली आहे.
राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुखांचं नाव
प्रभाकर देशमुख यांच्या नावावर राष्ट्रवादी शिक्कमोर्तब करण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील नाराज होणार हे निश्चित आहे. सोलापुरातील गटबाजीमुळेच विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांना निवडणूक लढण्याची विनंती केली होती. त्यानंतर पवारांनीही आधी निवडणूक लढण्याची घोषणा केली, मात्र नंतर पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी जाहीर करताना, एकाच घरात तीन तीन उमेदवार नको म्हणून, स्वत:ची उमेदवारी मागे घेतली.
त्यानंतर आता माढ्याचा तिढा कायम आहे. जर विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी मिळाली नाही, तर त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यासोबत रणजितसिंह मोहिते पाटीलही दिसले होते. तेव्हापासूनच रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
कोण आहेत रणजितसिंह मोहिते पाटील?
रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आहेत.
रणजितसिंह हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत.
2009 ते 2012 या कालावधीत रणजितसिंह हे राज्यसभेत होते.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे ते सुपुत्र आहेत.
रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. शिवाय, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्षही होते.
सोलापूर विभागाचंही महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतही रणजितसिंहांनी प्रतिनिधित्त्व केले होते.
माढा लोकसभा मतदारसंघ
माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.
2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली. या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती.
संबंधित बातम्या
माढ्यात दुसरा भूकंप, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या गळाला?
शरद पवार आणि माढ्याचं नातं काय?
राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार, अमोल कोल्हेंना उमेदवारी
इंदापुरात दगाफटक्याची भीती, सुप्रिया सुळेंची हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक
फडणवीसांची विधाने बालबुद्धीला शोभणारी: पवारांचा हल्ला
पवारांच्या मनात द्वेष, राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील
राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर