मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांचं वारं थंडावलं आहे. भाजपप्रणित एनडीएने पुन्हा देशात एकहाती सत्ता स्थापन केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचा ईव्हीएम संशय अद्यापही कायम आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवता यावा म्हणून भाजप मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये पराभूत झाली, असा घणाघाती आरोप शरद पवार यांनी भाजपवर केला. या तीन राज्यात सत्ता असूनही भाजपचा पराभव कसा झाला, असा संशय पवारांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट शेअर करत ईव्हीएमबाबतचा संशय व्यक्त केला.
“ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती. ही तिन्ही राज्ये एकमेकांना लागून आहेत आणि आता तेथील तत्कालीन सरकार भाजपा पाडण्याच्या विचारात आहे”, असं सांगत शरद पवारांनी पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी काही खास कामगिरी करु शकली नाही. त्यामुळे देशासह महाराष्ट्रात आघाडीला पराभवाचा सामना करवा लागला. या निकालाचा आढावा घेऊन त्याचं विश्लेषण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पक्षाची ताकद, निवडणुकांमध्ये पराभूत होण्याचं कारण यासर्वांवर चर्चा करण्यात आली.
देशात लोकसभा निवडणुकांदरम्यान आघाडीने अनेकदा ईव्हीएमबाबत नाराजी व्यक्त केली. ईव्हीएमची मतं आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची जूळवणी करण्याची मागणी घेत आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे दारही ठोठावले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
राज्यातही राष्ट्रवादीने ईव्हीएमचा मुद्दा धरुन लावला. प्रत्येकवेळी भाजप ईव्हीएम हॅक करत असल्याचा आरोप करण्यात आला. हे आरोप भाजपने नेहमी फेटाळले. मात्र, आता निवडणुकांचे निकाल समोर आल्यावरही राष्ट्रवादीचा ईव्हीएमवरील संशय कायम आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून मोठ्या फरकाने जिंकून आल्या तरीही त्यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला.
मोदींनी लोकांची दिशाभूल केली
या बैठकीत शरद पवारांनी मोदींवरही निशाणा साधला. देशात सत्ताबदल होणार, असं अनेक अभ्यासक, जाणकार, पत्रकारांसह राजकीय नेत्यांचं मत होतं. मात्र, झालं काही वेगळचं. देशात बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या सर्व गोष्टींचा फटका भाजपला बसणार होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोयीस्कररित्या प्रचाराचं सूत्र बदलत लोकांचं लक्ष महत्त्वाच्या मुद्यांवरुन हटवलं. मोदींनी समाजात उन्माद पसरवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका शरद पवारांनी मोदींवर केली.
काँग्रेस-राष्ट्रवादी विलीनीकरणावर शरद पवारांचं स्पष्टीकरण
पक्ष विलीनीकरणाची बातमी ही अफवा होती. ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये अशा विचारांच्या पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली गेली. ही बातमी साफ खोटी आहे. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व कायम राहील.
पाहा व्हिडीओ :