पुणे : इंधन दरवाढ, घरगुती गॅसच्या दरातील वाढ आणि महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरुन राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) आज पुणे दौऱ्यावर आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी इराणी थांबलेल्या हॉटेलबाहेर आक्रमक आंदोलन (NCP Protest) केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना वेळीच रोखत त्यांना हॉटेल परिसरातून बाहेर काढलं. यावेळी केंद्र सरकार आणि स्मृती इराणी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मनमोहन सिंग सरकारच्या काळात महागाईविरोधात स्मृती इराणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होत्या. त्यांनी मनमोहन सिंग सरकारला बांगड्यांचा आहेर पाठवला होता. आता नरेंद्र मोदी सरकार आहे आणि याच सरकारमध्ये स्मृती इराणी मंत्री आहेत. अशावेळी इराणी गप्प का? असा सवाल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचारत आहेत. त्याचबरोबर स्मृती इराणी यांना मागण्यांचं निवेदन द्यायचं आहे. त्यांना बांगड्यांचा आहेर द्यायचा आहे, अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी इराणी थांबलेल्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना बाहेर काढत काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं आहे.
देशात महागाई दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या दहा वर्षात जेवण दुपटीने महागले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतरच्या ८ वर्षांच्या काळात महागाईचा आलेख चढतच चालला असून सर्वसामान्यांना घरखर्च चालवणे कठीण होऊन बसले आहे. #अच्छेदिनएकजुमला #Inflation pic.twitter.com/7LoCiK2txF
— NCP (@NCPspeaks) May 16, 2022
दुसरीकडे केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी केला. मात्र, राज्य सरकार आपल्या वाट्याचा टॅक्स कमी करायला तयार नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलन करायचं झालं तर महाराष्ट्र सरकार विरोधात करावं. त्यांना त्यांचं अपयश झाकायचं आहे. त्यासाठी असा बनाव ते करत आहेत. त्यांनी पोलिसांनाही दबावात घेतलं आहे. त्यामुळे पोलीस त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई करत नाहीत. पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे. पुणे शहरात अशाप्रकारची दादागिरी कुणीही खपवून घेणार नाही. भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला जशास तसं उत्तर देईल, असा इशारा भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिलाय.
स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत अमित शाह यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. त्यासाठी स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून इराणी थांबलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आलं. तर त्याच परिसरातून भाजपचे कार्यकर्तेही मोदी मोदीच्या घोषणा देत बालगंधर्व रंगमंदिराकडे चालत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.