राष्ट्रवादीचा राज्यसभेचा खासदार मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित, चर्चा तर होणारच!

| Updated on: Sep 07, 2019 | 2:05 PM

राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदाराने नरेंद्र मोदींच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राष्ट्रवादीचा राज्यसभेचा खासदार मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित, चर्चा तर होणारच!
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मेट्रो भूमिपूजन प्रकल्पाच्या मुंबईतील या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार माजिद मेमन (Majeed Memon) हे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते मोठ्या प्रमाणात भाजप-शिवसेनेत जात आहेत. एकीकडे हे चित्र असताना, राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार असलेले माजिद मेमन (Majeed Memon) हे उपस्थित राहिल्याने अनेक चर्चा सुरु झाल्या.

मात्र राज्यकर्ता कुणीही असेल, चांगल्या कामाची आपण प्रशंसा करतो अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली. तसेच मी पक्षांतर करणार नाही, मी शरद पवारांशी निष्ठा बाळगून आहे, असंही माजिद मेमन यांनी यावेळी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुकीपूर्वी माजिद मेमन यांनी पंतप्रधान मोदींवर टोकाची टीका केली होती. विरोधकांचा पंतप्रधान कोण या प्रश्नाला उत्तर देताना  1 एप्रिल 2019 रोजी केलेल्या टीकेत माजिद मेमन म्हणाले होते, “मला वाटतं पंतप्रधान सुद्धा एक अनपढ, जाहील किंवा रस्त्यावरुन चालणाऱ्या माणसाची भाषा करत आहेत. ते इतक्या मोठ्या पदावर बसले आहेत, त्यांचं पद एक संवैधानिक पद आहे. त्या संविधानानुसार पंतप्रधान रस्त्यावर निवडला जाऊ शकत नाही”

पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर आता माजिद मेमन यांनी चांगल्या कामाची प्रशंसा म्हणत आपला सूर बदलल्याचं पाहायला मिळत आहे. मोदींच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाला माजिद मेमन हजर राहिल्याने चर्चा तर होणारच!.

संबंधित बातम्या 

पंतप्रधान मोदींनी लोकमान्य सेवा संघाच्या डायरीत नेमकं काय लिहिलं?   

चंद्राचा दरवाजा ठोठावणारा शेतकऱ्याचा मुलगा, ISRO प्रमुख के सिवन यांचा प्रेरणादायी प्रवास