बीड : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. शिवसेना-भाजप यांची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची सध्या उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सात टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बीड मतदारसंघाचाही समावेश आहे. भाजपकडून डॉ. प्रितम मुंडे यांची उमेदवारी जाहीर होऊन बराच काळ लोटला असला तरी राष्ट्रवादीकडे मात्र उमेदवाराचा वणवा दिसत असल्याचं चित्र आहे. प्रितम मुंडेंविरुद्ध कुणीही इच्छुक नसल्याने राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे तर राष्ट्रवादीकडून सुरेश धस हे आमनेसामने होते. यात गोपीनाथ मुंडेंनी विजयाची बाजी मारली. मात्र गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यांच्या कन्या प्रितम मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रितम मुंडेंविरुद्ध उमेदवार दिला नाही. परंतु काँग्रेसकडून माजी मंत्री अशोक पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले होते. यात प्रितम मुंडेंनी बाजी मारत देशात सर्वात जास्त मते घेण्याचा विक्रम केला होता.
आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजपकडून बीड लोकसभेसाठी महिनाभरापूर्वीच विद्यमान खा. प्रितम मुंडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु राष्ट्रवादीत उमेदवारासाठी अद्याप पेच कायमच आहे. ओबीसी चेहरा म्हणून राष्ट्रवादीचे नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. मात्र क्षीरसागर यांची पक्षश्रेष्ठींसोबत असलेली नाराजी आणि भाजप नेत्यांसोबत वाढलेली जवळीक यामुळे त्यांचं नाव निश्चित नाही. सध्या जयदत्त क्षीरसागर खुलेआम भाजपच्या स्टेजवर हजेरी लावत असल्याने राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा पत्ता कट झाला हे स्पष्ट आहे.
गेवराईचे अमरसिंह पंडित आणि माजलगाचे प्रकाश सोळंके हे दोघे नेते मातब्बर आहेत. या दोघांपैकी कोण उमेदवार राहिल हे अद्याप अस्पष्ट नाही. शिवाय महिला उमेदवारासमोर महिला उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीकडे एकही ताकतवर महिला नसल्याने राष्ट्रवादीत मोठी घालमेल सुरू झाली आहे. त्यामुळे प्रितम मुंडे यांचं पारडं सध्या तरी जड आहे यात शंका नाही.
काँग्रेसच्या रजनी पाटील उमेदवार?
आघाडीत बीड लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. पण ही जागा काँग्रेसला सोडून राज्यसभेच्या माजी खा. रजनी पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची दाट शक्यता आहे. बीड जिल्ह्यात काँग्रेसचं बलाबल कमी आहे. केज आणि अंबाजोगाई वगळता जिल्ह्यात सर्वदूर काँग्रेस नसल्यातच जमा आहे. परंतु राष्ट्रवादीचे बलाबल मोठे आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती आणि स्थानिक सोसायटीवर राष्ट्रवादीची पकड मजबूत असल्याने काँग्रेसला बळ दिल्यास लढत मजबूत होईल अशी चिन्ह आहेत.