नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांचा नाशिक दौरा संपवून मुंबईकडे रवाना झाले (Sharad Pawar meet Sonia Gandhi). शरद पवार हे मुंबईहून दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या 4 नोव्हेंबरला शरद पवार काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती आहे (Sharad Pawar meet Sonia Gandhi).
परतीच्या पावसात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी शरद पवार शुक्रवारी (1 नोव्हेंबर) नाशिकच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते आज मुंबईकडे रवाना झाले.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन घमासान पाहायला मिळत आहे. एकीकडे युतीमध्ये मुंख्यमंत्री पदावरुन खोडा पडल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. तर राष्ट्रवादी ही विरोधी पक्षातच राहणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. मात्र, त्यानंतर आता शरद पवार हे सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीदरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने चर्चा होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही सोनिया गांधींची भेट घेतली
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल (1 नोव्हेंबर)दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती आणि सत्ता स्थापनेवर चर्चा झाली. त्यानंतर आता शरद पवारही सोनिया गांधी यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे.
जर शरद पवारांनी शिवसेनेसोबत मिळून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तर कदाचित भाजपचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगू शकते. यापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेने मनात आणलं तर आम्ही बहुमत मिळवू शकतो, असा थेट इशारा भाजपला दिला होता. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारणाला एक रंजक वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.