मुंबई: आझाद मैदानावरील मोर्चात भेंडी बाजारातील शेतकरी घुसवले होते, अशी खोचक टिप्पणी करणारे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचा शरद पवार (Sharad Pawar) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. प्रवीण दरेकर यांचे हे वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे. कारण, एकेकाळी मीदेखील विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो. (NCP Supremo Sharad Pawar slams BJP leader Pravin Darekar)
आझाद मैदानावरील मोर्चासाठी शेतकरी एवढ्या लांबवरुन चालत आले होते. त्यांचे पाय सुजले होते, फोड आले होते. पण ते एका तडफेने आझाद मैदानावर पोहोचले होते. अशावेळी विरोधी पक्षनेत्याने खरंतर या शेतकऱ्यांची भेट घ्यायला हवी होती. मात्र, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याने अशाप्रकारचे वक्तव्य करणे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. एकेकाळी मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, याची मला आता लाज वाटत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज आझाद मैदान येथे पार पडलेल्या शेतकरी मोर्चावर टीका केली होती. या आंदोलनात शेतकरी कमी इतर लोकच जास्त घुसवली आहेत. भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला होता. आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्यानेच अशाप्रकारची गर्दी गोळा करण्याची आघाडीवर वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली होती.
पंजाब-हरियाणा देशाचा अन्नदाता आहे. न दुखावता मार्ग काढायला हवा होता. ज्या पद्धतीने येण्या जाण्यासाठी काही परवानग्या द्यायला हव्या होत्या. पण जाचक अटी लादल्या गेल्या. त्यामुळे प्रतिकार झाला. संयम आणि 60 दिवसांचं आंदोलन पाहून ही परिस्थिती हाताळायला हवी होती. पण ते न केल्याने वातावरण चिघळलं. जे घडतंय त्याचं समर्थ नाही, पण ते का घडतंय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शांततेने आंदोलन करणारा शेतकरी संतप्त का होतो याची जबाबदारी घ्यायला हवी होती, असे शरद पवार यांनी सांगितले.
केंद्राने अजूनही शहाणपणा दाखवावा. टोकाची भूमिका घेऊ नये. रास्त प्रश्नासंबंधित ज्या मागण्या असतील त्याला अनुकूल निर्णय घ्यावा. बळाचा वापर करून काही निर्णय घेतला. एकेकाळी अस्वस्थ पंजाब पाहिला आहे. तो सावरला आहे. त्या पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचे पातक मोदी सरकारने करू नये, असा इशाराही यावेळी शरद पवार यांनी दिला.
संबंधित बातम्या:
आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका; त्यांची संपत्ती जप्त करा: कंगना रनौत
भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी?, आंदोलनात लोकं घुसवली; प्रवीण दरेकरांची टीका
गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही; शरद पवारांचा अमित शाहांवर निशाणा
(NCP Supremo Sharad Pawar slams BJP leader Pravin Darekar)