लैच अवघड, जाता जाताही राष्ट्रवादी काँग्रेसने कोश्यारी यांना डिवचले, मार्कशीट व्हायरल, इतिहासात भोपळा, कला मात्र…

| Updated on: Feb 17, 2023 | 3:05 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेल्या संदेशात एक पत्रही आहे. सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिहिलेले हे पत्र असल्याचं अत्यंत खुमासदार पद्धतीने यात दाखवण्यात आलंय.

लैच अवघड, जाता जाताही राष्ट्रवादी काँग्रेसने कोश्यारी यांना डिवचले, मार्कशीट व्हायरल, इतिहासात भोपळा, कला मात्र...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची राज्यपाल (Governor) पदावरून हकालपट्टीच झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) लावून धरली होती. भाजपने (BJP) राज्यपालांवर कारवाई केली नाहीच, मात्र राज्यपालांनी स्वेच्छेने दिलेला राजीनामा मंजूर झाला आहे. शनिवारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शपथ घेतील. मात्र कोश्यारी यांना जाता जाता राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच ठोला मारलाय. भगतसिंह कोश्यारी यांची एक उपहासात्मक मार्कशीट तयार करण्यात आली आहे. व्हॉट्सअप विद्यालयाची ही मार्कशीट असल्याचं त्यात दाखवण्यात आलंय.  राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केलेली मार्कशीट, त्याला प्रगती पुस्तक न म्हणता अधोगती पुस्तक म्हटलंय. त्यात विविध विषयांवरील त्यांची मार्क दाखवण्यात आले आहेत.

राज्यपालांना किती मार्क?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तुकडी ढ असल्याचं मार्कशीटवर नमूद करण्यात आलंय. तर हजेरी क्रमांक ४२* असे दाखवण्यात आले आहे.

इतिहास विषयात भोपळा, भूगोलात ३५, नागरिक शास्त्रात १७ , सामान्य त्रानात ३४ तर कला विषयात त्यांना १०० पैकी शंभर मार्क देण्यात आले आहेत.

राज्यपालांनी महाराष्ट्रातील इतिहास पुरुषांवर केलेल्या भाष्यांवरून त्यांना इतिहासात ०० गुण देण्यात आले.

शेरा काय?

व्हॉट्सअपवर व्हायरल करण्यात आलेल्या या मार्कशीटमध्ये शेराही देण्यात आलाय. सदर विद्यार्थ्याीच बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या विद्यार्थ्याची वर्तणूक पाहता, याची सुरुवात बालवाडीपासूनच सुरु करणे योग्य राहील, अशा शब्दात डिवचण्यात आले आहे.

शाळेतून काढून टाकण्यात आले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेल्या संदेशात एक पत्रही आहे. सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिहिलेले हे पत्र असल्याचं अत्यंत खुमासदार पद्धतीने यात दाखवण्यात आलंय.

आमच्या शाळेतील भगतसिंह कोश्यारी नामक विद्यार्थ्याला तत्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्यांची गच्छंती करण्यात येत आहे… असं या पत्रात नमूद करण्यात आलंय.

सदर विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्याने केले आहे…