नवी दिल्ली : पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, असं खासदार संजय राऊत निक्षून सांगत असतानाच आता राष्ट्रवादीकडूनही अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा आग्रह होताना दिसत आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची चर्चा अद्याप झालेली नाही, परंतु अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाही मिळावं, अशी मागणी असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी (NCP Wants CM in Maharashtra) सांगितलं.
राष्ट्रवादीला शिवसेनापेक्षा दोनच जागा कमी मिळाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाही मिळावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, सुनिल तटकरे यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्याची तारीख अद्याप निश्चित नसल्याचं तटकरेंनी सांगितलं.
चर्चा आणि आराखडे
मुख्यमंत्रिपद जर शिवसेनेला पाच वर्षांसाठी दिलं, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद पाच वर्ष पूर्णवेळ मिळेल. उपमुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादीकडून अजित पवार असू शकतात.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे
अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद जर राष्ट्रवादी-शिवसेनेत विभागलं गेलं, तर काँग्रेसचा उपमुख्यमंत्री पाच वर्ष पूर्णवेळ राहील, अशी चर्चा आहे.
खातेवाटपाचे काय?
महाविकासआघाडीमध्ये खातेवाटप सर्वांच्या सहमतीने होण्याची शक्यता
महत्त्वाची चार खाती प्रत्येक पक्षाला वाटून देणार
ग्रामीण भागाशी संबंधित खाती प्रत्येकी एका पक्षाच्या वाट्याला येऊ शकतात
गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता
महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता
नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिसऱ्या पक्षाला दिलं जाण्याची शक्यता
ग्रामीण भागाची कृषी, सहकार, ग्राम विकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात
महासेनाआघाडी सरकार सत्तेत येण्याआधी मंत्रिपद, खातेवाटप यावरुन वाटाघाटी सुरु झालेल्या आहेत. राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची काल पाच तास बैठक झाल्यानंतर आज पुन्हा बैठक होत आहे. आधी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आणि नंतर एकत्र बैठक होत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची एकत्रित बैठक मुंबईत होणार आहे.
अडीच-अडीच नाही : राऊत
राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याविषयी आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. ही चर्चा योग्य नसून त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन बिनसल्यानंतर भाजपशी काडीमोड घेतलेली शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
महासेनाआघाडी नव्हे महाविकासआघाडी
तीन पक्षांच्या आघाडीला दिलेल्या नावावरुन काँग्रेसची नाराजी असल्याची चर्चा आहे. ‘महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ या माध्यमांनी ठेवलेल्या नावाला काँग्रेसचा आक्षेप आहे. त्याऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवल्याची माहिती आहे.
‘महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ या नावातून केवळ शिवसेना या एकाच पक्षाचं नाव अधोरेखित होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नावाचा यामध्ये उल्लेख होत नाही. सर्वच पक्षांच्या नावांचा समावेश करण्याचा आग्रह धरण्याऐवजी कोणाचंच नाव समाविष्ट करु नये. त्याऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव ठेवण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं (NCP Wants CM in Maharashtra) आहे.