बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा परिषदेच्या न्यायालयीन लढ्यात राष्ट्रवादीला यश प्राप्त झालं आहे. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी 4 जानेवारीला झालेल्या मतदानानंतर पाच सदस्यांच्या मुद्यावरून राखीव ठेवलेला निकाल आज उच्च न्यायालयाच्या आदेशाने जाहीर करण्यात आला. यामध्ये अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या शिवाजी शिरसाठ, तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. त्यामुळे यंदा बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असणार आहे (Beed Zila Parishad President Election ).
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात डेरेदाखल झालेल्या पाच सदस्यांचे मतदानाचे अधिकार गोठवलेले होते. त्यामुळे 4 जानेवारीला झालेल्या निवडीनंतर तो निकाल बंद पाकिटात ठेवण्यात यावा आणि 13 जानेवारीला म्हणजेच आज न्यायालयाच्या समोर तो उघड करण्यात यावा असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आज उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान निकालाचे ते बंद पाकीट उघडण्यात आले. त्यामध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बाजूने 32, तर भाजपच्या बाजूने 21 मतं पडल्याचं निष्पन्न झालं. मतदानाचा अधिकार गोठवलेल्या त्या 5 सदस्यांचा विचार केला तरीही अध्यक्ष, उपाध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच विजयी ठरतात, या निकषावर न्यायालयाने निकाल जाहीर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.
धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आणि सहकाऱ्यांनी फोडाफोडीच्या राजकारणाला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडी आणि न्यायालयाने दिलेला निकाल पाहता धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील या लढ्याला यश आले असेच म्हणावे लागेल.
दरम्यान, त्या पाच सदस्यांचे मतदान करण्याचे अधिकार गोठवलेले असले, तरी त्यांच्या रिट याचिकेला उच्च न्यायालयाने दाखल करून घेत लवकरात लवकर त्याबाबतही सुनावणी होईल असे म्हटले आहे. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जुळवलेले संख्याबळ पाहता अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या घोषित करण्यात आलेल्या निवडी कायम राहतील असेच चित्र आहे. दरम्यान, बीडच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ ह्या येत्या दोन दिवसात अध्यक्षपदाचा भार स्वीकारणार असून उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी आज पदभार स्वीकारला आहे.
Beed Zila Parishad president Election