मुंबई : अहमदनगर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना निलंबित करण्यात आलंय. पक्षाचा आदेश न पाळल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली. शिवाय अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांचीही पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
निलंबनाचं पत्र संबंधितांना पाठवण्यात आलंय. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मदत करु नये असे स्पष्ट आदेश पक्षाने दिले होते. तरीही 18 नगरसेवकांनी भाजपला मतदान केलं आणि याची पक्षाला कल्पनाही दिली नाही. पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. वाचा – अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचा भंग होत असताना त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना न दिल्याबद्दल अहमदनगर शहर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांनी दिले आहे. pic.twitter.com/GtKinPOo6A
— NCP (@NCPspeaks) January 12, 2019
या नगरसेवकांना पक्षाकडून नोटीस पाठवून सात दिवसात बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. पण नोटिशीला कुणीही उत्तर दिलं नाही. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. अहमदनगर शहरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय.
विशेष म्हणजे आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात नगरची जागा काँग्रेससाठी सोडली जाणार असल्याचं बोललं जातंय. या जागेवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पण राष्ट्रवादीने ही कारवाई केल्यामुळे नगर शहरात काँग्रेसला राष्ट्रवादीची किती मदत होईल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
महापौर निवडणुकीत नेमकं काय झालं?
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं. त्यामुळे भाजपचे बाबा वाकले महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली.