नवी दिल्ली : अजित पवार यांनी भाजपसोबत मुख्यमंत्रिपदासाठीच डील केली आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला केलं जाणार आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत हे सध्या दिल्लीत आहेत. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
बुलढाण्यात बसचा मोठा अपघात झाला. लोकांचे जीव गेले. त्यांच्या चितेचा जाळ संपलेला नसताना हे लोक शपथविधी करत होते. प्रेतं पडलेली आहेत. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे आणि हे सत्ताधारी लोक इकडे राजभवनात हे लोक पेढे वाटत होते. एकमेकांना मिठ्या मारत होते. या सगळ्यांना याची किंमत चुकवावी लागणार आहे, असं संजय राऊत म्हणालेत. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. त्यां मृतांच्या चिता जळत असताना ज्या घाईत राजभवनावर शपथविधी जल्लोषात साजरा झाला हे निर्दयी आहे, असंही ते म्हणाले.
आज गुरुपौर्णिमा आहे, आमचे गुरू बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. काल गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी गुरूला दगा देण्यात आला आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर टीकास्त्र डागलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातून, समाजकारणातून, इतिहासातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांचा इतिहास पुसण्यासाठी हे घाणेरडं राजकारण सुरू आहे. हा खेळ सुरू आहे. पण हा असला खेळ लोकशाही आणि देशाला परवडणारा नाही, असंही राऊत म्हणालेत.
सध्याचे मुख्यमंत्री आणि सोबतचे 16 आमदार घरी जाणार आहेत. ते 16 आमदाकर अपात्र ठरणार आहेत. 10 ऑगस्टपर्यंत हा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी ही तयारी सुरू आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर टीका केली आहे.
अजित पवार जाणार हे भाजपसोबत जाणार आहेत, हे आम्हाला माहीत होतं. त्यांनी भाजपसोबत जाण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे जाणार हेही आम्हाला माहीत होतं, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रात सध्या ईडीचं राजकारण सुरू आहे. आमच्या हातात दोन तासांसाठी ईडी द्या. मग पाहा महाराष्ट्राचं राजकारण आम्ही बदलून दाखवतो, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपने राजकीय पक्षांना फोडणं सुरू केलं आहे. महाराष्ट्रात अशी परंपरा कधीच नव्हती. पण महाराष्ट्रातील जनता आमच्यासोबत आहे. आमच्यासोबतच राहील. जनता आम्हाला साथ देणारी आहे, असंही राऊत म्हणाले.