संदिप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 07 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा काल निर्णय आला. अजित पवार गट हाच राष्ट्रवादी पक्ष आहे आणि घड्याळ चिन्हही अजित पवार गटकडेच राहील, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या निर्णयावर भाष्य केलं. राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला आहे. त्याचे कर्ते- धरते, संस्थापक हे शरद पवार आहेत.आता हे लोक आयोगासमोर जाऊन बसले आणि सांगितल की मी पक्ष स्थापन केला… याला काय म्हणावं?, असं संजय राऊत म्हणाले.
निवडणूक आयोग पक्ष आयऱ्या गैऱ्याच्या हाती देत आहे. जो अन्याय शिवसेनेच्या बाबत झाला तोच शरद पवार यांच्या बाबत झाला, याला मोदी गॅरंटी म्हणतात… ED, CBI लावून तुम्हाला पक्ष फोडायला लावला. नॅशनल करप्त पार्टी ज्यांना भाजप म्हणाले तो पक्ष अजित पवार यांना दिला. मोदी शाह या दोन नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे. त्यांना बदला घ्यायचं आहे हे आता सिद्ध झालं आहे. महाराष्ट्राचा सूड घेतला आहे हे दिसून आलं. पण जिथे ठाकरे तिथं शिवसेना… आणि जिथं शरद पवार तिथं राष्ट्रवादी…, असं संजय राऊत म्हणाले.
शरद पवार खंबीर आहेत. लवकरच महाविकास आघाडीचे नेत्यांचे संयुक्त दौरे राज्यात होतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची काल फोनवर सविस्तर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अनुभव सविस्तर त्यांना सांगितला. आम्ही सगळे एकत्र ठामपणे उभे आहोत. या अन्यायाविरोधात लढण्याासाठी आम्ही तयार आहोत. लोकच आता या लोकांना धडा शिकवतील, असं संजय राऊत म्हणाले.
माजी खासदार, स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती मागच्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? याची कुटुंबियांना देखील माहिती नाहीये. अशात महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नॉट रीचेबाल आहेत हे मला माहीत नाही. आमची त्यांच्याशी चर्चा झाली नाही. पण आमचं मत आहे की, श्रीमंत शाहू छत्रपती यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवावं. आमच्याकडे काही मते आहेत त्यामुळं त्यांना राज्यसभेवर पाठवाव अस मला वाटतं, असं संजय राऊत म्हणाले.