नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, एनटी रामाराव आणि जयललिता यांच्यानंतर आता उत्तरप्रेदशातील जेष्ठ नेत्या मायावती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला जाणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष कपूर करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, अद्याप कुणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. विशेष म्हणजे, मायावती यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन साकारणार असल्याची चर्चा आहे.
भारतीय राजकारणात सक्षम नेत्या म्हणून मायावती यांची ओळख आहे. मायावती यांनी आतापर्यंत चारवेळा उत्तरप्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. तसेच, देशातील अनेक राज्यात मायावती यांच्या पक्षाची ताकद आहे.
कोण आहेत मायावती?
देशात मागासवर्गीयांच्या प्रतिनिधी म्हणून मायावती यांची ओळख आहे. तसेच देशातील पहिली मागासवर्गीय महिला मुख्यमंत्री म्हणूनही मायावती यांची ओळख आहे. मायावती या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. तसेच मागासवर्गीय, ओबीसी आणि मुस्लीम समाजासाठी बहुजन समाज पार्टी काम करते. मायावती सर्वात पहिल्यांदा 1995 मध्ये उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या. आतापर्यंत 1995, 1997, 2002 आणि 2007 अशा चार वेळेस मायावती यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे.
15 जानेवारी 1956 रोजी मायावती यांचा नवी दिल्ली येथे जन्म झाला. मायावती यांचं शिक्षण BA, B.ED., आणि LLB झालं आहे. दिल्ली विद्यापीठातून मायावती यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर त्यांनी बसपामध्ये काम करण्यास सुरुवात केली.