नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा यांनी योगाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एक राजकीय वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गांधी परिवारातील नव्या पीढीने योग केला नाही, म्हणूनच त्यांचे राजकारण बिघडल्याचे मत रामदेव यांनी केले.
बाबा रामदेव जागतिक योग दिनाला (21 जून) नांदेड येथे येणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हजर असणार आहे. त्यापूर्वीच रामदेव यांनी वादग्रस्त वक्तव्य करत वाद ओढावून घेतला आहे. रामदेव म्हणाले, “पंतप्रधान मोदी सार्वजनिकपणे योगा करतात. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी लपून योगा केला. त्यांच्या पुढील पीढीने योगाच केला नाही. त्यामुळेच त्यांच्या राजकारणात गडबड झाली आणि अपयश आले. योग करणाऱ्यांचे चांगले दिवस (अच्छे दिन) नक्कीच येतात.’
रामदेव यांनी काँग्रेसवर टीकेची एकही संधी सोडलेली नाही. अनेकदा त्यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्यही केली गेली. मात्र, आता काँग्रेसच्या अपयशामागे थेट योगाचा संबंध जोडून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता काँग्रेस याला कशी प्रतिक्रिया देते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.