नवी दिल्ली: “मी सुनील तटकरे (Sunil Tatkare), दिल्लीत आहे, मजबुतीने, विचाराने, सिद्धांताने पवार साहेबांसोबत आहे. अफवा पसरवणाऱ्या बिकाऊ पत्रकारांवर कायदेशीर कारवाई करता येईल का याची चाचपणी करणार” अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी टीव्ही 9 मराठीकडे दिली.
सुनील तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरु असल्याचं वृत्त होतं. त्याबाबत तटकरेंना विचारलं असता, त्यांनी या बातम्यांवरुन संताप व्यक्त केला.
तटकरे म्हणाले, “विकृत आणि बिकाऊ पत्रकारितेचा नमुना म्हणजे आजची बातमी आहे. मी आता दिल्लीत आहे, पण बातम्यांमध्ये असं दाखवलं जात आहे की माझी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरु आहे. मी आता ज्या बंगल्यासमोर आहे तो बंगला मी खासदार झाल्यामुळे मला मिळाला. माझी पत्नी माझ्यासोबत आहे. मी दिल्लीत आहे हे चित्र महाराष्ट्रातील जनतेला दाखवा. एखाद्याचं चारित्र्य हनन किती विकृत पद्धतीने होऊ शकतं, त्याचा हा नमुना आहे. काल आम्ही पवारसाहेबांसोबत मुख्यमंत्र्यांकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलो होतो. ते सर्वांनी पाहिलं. काल दिवसभरात एमआयडीसी सीईओ, प्रधान सचिव यांच्यासोबत बैठका झाल्या. परवा आम्ही दिवसभरात श्रीवर्धनमध्ये होतो. त्यामुळे या अफवा आता थांबवाव्या. मी मजबुतीने, विचाराने, सिद्धांताने पवारसाहेबांसोबत राष्ट्रवादी पक्षात आहे. अशा अफवा पसरवणाऱ्या बातम्या देणाऱ्यांविरोधात कायदेशीर काय कारवाई करता येईल, हे मी पाहत आहे”
राजकीय पक्षांमार्फत पत्रकारांना हाताशी घेऊन बिकाऊ पद्धतीने कोण काय करत असेल तर त्यासारखं राजकीय दुर्दैव नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.
प्रतिमा मलिन करणं थांबवावं. ही बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता नाही. बातमी दाखवणाऱ्यांनी सोर्स सांगावा, मी कधी, कुठे उद्धव ठाकरेंशी चर्चा केली हे दाखवावं, असं आव्हान सुनील तटकरेंनी दिलं.
संबंधित बातम्या
शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ईडी चौकशीतून काही निघणार नाही, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची पाठराखण
भुजबळ स्वगृही परतणार का, उद्धव ठाकरे म्हणतात, “वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल”