मनोज लेले, रत्नागिरीः पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant warise) मृत्यू प्ररकणातील आरोपी हे नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सोबत असतात, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्याने केलाय. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी या मृत्यूमागे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीच चिथावणी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरून निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांच्यावर टीका केली की उद्धव ठाकरे खुश होतात. त्यामुळे विनायक राऊत हे सारखं नारायण राणेंवर आरोप करतात, असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलंय. पण अशा प्रकारे किती दिवस उद्धव ठाकरे यांची भांडी घासणार, असा सवाल निलेश राणे यांनी केलाय. तसेच ज्या आरोपीशी नारायण राणे यांचा संबंध जोडला जातोय, तो आरोपी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासोबत मागील एका वर्षात किती वेळा बसले, हे एकदा जाहीर करावं, असं आवाहन निलेश राणे यांनी केलंय.
रिफायनरीच्या पैशावर पोसणाऱ्या गुंडांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. पंढरीनाथ आंबेरकर यानी ही जी हत्या घडवून आणली आहे, त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनाच उत्तर द्यावं लागणार आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यावरून प्रोत्साहन घेऊनच ही हत्या झालीय की काय अशी स्थिती आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केलाय.
मालवणचं सी वर्ल्ड आणि रिफायनरी यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका. पोलीस बळ वापरा, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. नारायण राणे, निलेश राणेबरोबर राहणारा गुंड आहे. या घटनेमागे राणे यांचीच चिथावणी आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केलाय.
विनायक राऊत यांचे आरोप निलेश राणे यांनी फेटाळून लावलेत. ते म्हणाले, ‘ पत्रकार शशिकांत वारिसे यांचं निधन झालं. ज्याच्यावर आरोप झाले, त्याच्यावर ३०२ चं सेक्शन लागलं आहे. पोलीस तपास करत आहेत. असं असतानाही विनायक राऊत यांनी आरोप केलाय की तो आरोपी राणे यांच्या जवळचा आहे… पण
हाच आरोपी एक दीड महिन्यापूर्वी कलेक्टर कार्यालयात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासोबत उपस्थित होता की नाही? ऱिफायनरीच्या किती मीटिंगमध्ये ते भेटत असतात, याचा खुलासा राजन साळवी आणि विनायक राऊत यांनी करावा, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.
विनायक राऊत यांची खासदारकीची कामं संपली आहेत. राणेंवर काही बोललं की उद्धव ठाकरे खुश होतात. किती वर्ष तुम्ही उद्धव ठाकरे यांची भांडी घासणार आहात? तुम्हाला रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या लोकांनी निवडून दिलंय. त्यांच्यासाठी कामं करा.. उगाच हवेत गोळीबार करायचा आणि राणेंना अडकवायचा प्रयत्न करा, हा एकच कार्यक्रम तुमच्या आयुष्यात शिल्लक आहे. तुमचा रडीचा गेम चालतोय. कोकणात लोक तुम्हाला रड्या म्हणून ओळख आहेत, अशी टीका निलेश राणे यांनी केली.