रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातातील कठपुतली असल्याचा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी लगावला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षातील अनेक प्रमुख नेते नाराज आहेत, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचा दावाही निलेश राणेंनी (Nilesh Rane on Cabinet Expansion) केला.
आमदार नाराज होतील म्हणून मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचं वजन नाही. जसं पवारसाहेब बोलतात, तसं मुख्यमंत्री वागतात, असा टोलाही भाजपवासी झालेल्या निलेश राणेंनी लगावला आहे.
यापुढेही मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पुढे गेली, तर नवल वाटायला नको, कारण तीन पक्षाच्या सरकारमध्ये अंतर्गत अनेक वाद आहेत, बाहेरुन काही दिसलं तरी अनेक विषयांवर वाद असल्याने महाविकास आघाडीची खरी परिस्थिती लवकरच कळेल, असं निलेश राणे म्हणाले.
शिवसेनेकडील खात्यासाठी काँग्रेस आग्रही, विस्ताराआधीच फेरबदलाचा ‘उद्योग’?
मुख्यमंत्र्यांना शरद पवारांवर अवलंबून रहावं लागतं, स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता मुख्यमंत्र्यांकडे नाही, मुख्यमंत्र्यांना पवार म्हणाले उठा, तर उठणार आणि बसा म्हणाले तर बसणार. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कठपुतली असल्याचा घणाघात निलेश राणेंनी केला. पवारांना उद्धव ठाकरे ही कठपुतली बरी वाटल्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवलं, असा आरोपही निलेश राणेंनी केला.
शरद पवारांना हवे ते सर्व निर्णय ते मागच्या दरवाजाने घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचे अधिकारच उद्धव ठाकरे यांना माहीत नाहीत. कर्जमाफी होणार मार्चमध्ये, कर्जमाफीचे पैसे कुठून येणार हे महाराष्ट्राला कळू दे, सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना ते ‘मातोश्री’वर बोलल्याप्रमाणे बोलतात. त्यांच्या शब्दाला किंमत नाही आणि वजन नाही, पवार सर्व गोष्टी विचार करुन करतात, याचा अंदाज ठाकरेंना लवकरच येईल, असं सूतोवाचही निलेश राणेंनी (Nilesh Rane on Cabinet Expansion) केलं. ठाकरे मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार डिसेंबर अखेरपर्यंत होण्याची चिन्हं आहेत