मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेच्या नेत्यांची वारंवार ट्विटरवरून किंवा जाहीर प्रतिक्रियांमधून खिल्ली उडवणाऱ्या राणे सुपुत्रांमुळे भाजप आणि शिंदे गटात (Eknath Shinde) खडाजंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंचा गट शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडला तरीही शिवसेना आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंप्रति आमची निष्ठा असल्याचं शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनीही नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली. तसेच भाजप नेते निलेश राणे, नितेश राणे यांच्या सुपुत्रांनीही ठाकरे घराण्यावर सुरु असलेली टीका आता बंद करावीत. देवेंद्र फडणवीसांना सांगून आम्ही ही टीका बंद करू असं वक्तव्य केसरकरांनी केलं होतं. मात्र दीपक केसरकरांनाच निलेश राणे यांनी पुन्हा एकदा सुनावलं आहे. दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका…असा इशारा त्यांनी दिलाय. त्यामुळे राणे पुत्रांमुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीतून महाराष्ट्रात सरकार बनलं आहे. त्यामुळे आता भाजप नेते विशेषतः राणे पुत्र आणि किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना नेते आणि ठाकरे घराण्यावरची टीका थांबेल का, असा प्रश्न विचारला असता त्यावर केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाहीत, शिवसेना वाचवत आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मित्रपक्षांनी चुकीच्या पद्धतीने टीका टाळावी, अशी विनंती आम्ही केली आहे. किरीट सोमय्या यांनी आता अशी टीका करणार नसल्याचा शब्द दिला आहे. तसेच नारायण राणे यांची मुलं लहान आहेत. देवेंद्र फडणवीस यांना सांगून आम्ही त्यांनाही समजावून सांगू.. असं वक्तव्य केसरकर यांनी केलं होतं.
केसरकर यांनी लहान म्हणल्याचं निलेश राणे यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून येतंय. त्यांच्या प्रतिक्रियेला निलेश राणे यांनी तत्काळ ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलंय. 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात, हे विसरू नका, असा इशारा राणे यांनी दिला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपतील टीकाकार यांच्यात आगामी काळात मोठी खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 13, 2022