सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात एका कार्यक्रमात एकमेकांची स्तुती केली. त्यानंतर सिंधुदुर्गात पुन्हा राणे आणि शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच नितेश राणे विरुद्ध दिपक केसरकर असा सामना पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख व्हायचं नसेल तर केसकरांनी विचार करुन बोलावं असा इशारा नितेश राणे यांनी दिला. तसेच दिपक केसरकरांनी दुसरं नाना पटोले बनू नये असाही सल्ला नितेश राणेंनी दिला.
नितेश राणे यांनी दिपक केसरकरांवर गंभीर आरोप केले आहेत. सावंतवाडीत खेळणी घोटाळा, गोव्यात केसरकरांनी विकत घेतलेल्या जमिनीची माहिती घेऊन ईडीकडे तपासाची मागणी करणार आहे. केसरकरांना दुसरा अनिल देशमुख बनायचं नसेल तर त्यांनी विचार करून बोलावं असा सल्ला नितेश राणे यांनी दिला आहे.
दुसरीकडे दिपक केसरकरांनीही राणेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, “फालतू धमक्या मला ऐकूण घेण्याची सवय नाही. नितेश राणेंनी बोलताना विचार करून बोलावं. त्यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं नाहीतर, राजकीय संघर्ष अटळ आहे. या अगोदर नारायण राणे यांच्या सोबतचा राजकीय संघर्ष मी सूरू केला नव्हता, तो राणेंनी सुरू केला. त्यामुळे नितेश राणेंनी स्वतः खाजवून खरूज काढू नये.”
“सावंतवाडी संस्थानची परंपरा आहे ती आम्ही कुणाला चिडवत नाही. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. परंतु कोण अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यांनी जे बोलले ते तपासून पहावं व शब्द मागे घ्यावेत हा वाद इथेच मिटेल,” असं प्रत्युत्तर केसरकर यांनी दिलं आहे.
Nitesh Rane and Dipak Kesarkar political fight in Sindhudurg