मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी पहाता अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक ठाकरे गट, शिंदे गट तसेच भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा दोन्ही गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजपकडून (BJP) या पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. लोकांमध्ये 24 तास काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपाने उमेदवारी दिली. ही गर्दी म्हणजे आमच्या मुरजी भाईंच्या कामाची पोहोचपावती आहे. मला विश्वास आहे की जसं आता वातावरण आहे तसंच निवडणूक झाल्यावरही दिसेल असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. त्यांना स्वत:चा पक्ष वाचवता आला नाही, चिन्ह वाचवता आलं नाही. वडिलांच्या आजारावेळी आदित्य ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते. एकदा प्रवासादरम्यान स्वत: रमेश लटके यांनी मला त्यांना किती मानसिक त्रास सुरू आहे हे सांगितलं. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान या सर्व गोष्टी बाहेर निघाल्यानंतर सहानुभूती कोणाला मिळते ते पाहू असंही नितेश राणे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. कालपर्यंत एका स्त्रीला त्रास देण्यात आला. आमची ही लढाई गद्दार वृत्तीच्या विरोधात आहे, त्यामुळे आम्हाला विजय निश्चित मिळेल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.