सिंधुदुर्ग : उपअभियंत्यावर चिखलफेक करणारे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 कार्यकर्त्यांना 23 जुलैपर्यंत न्यायलीयन कोठडी देण्यात आली आहे. कणकवलीतील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयानंतर नितेश राणे यांनी जामीनासाठी ओरोस जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याआधी कोर्टाने नितेश राणे यांच्यासह त्यांच्या 18 समर्थकांना पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र आता त्यांच्या पोलीस कोठडीत बदल करत न्यायलयीन कोठडीत सुनावली आहे.
कोर्टात काय घडले ?
आज(9 जुलै) आमदार नितेश राणे यांच्यासह 18 समर्थकांना दुपारी कणकवली येथील दिवाणी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी कोर्टाने त्यांच्या पोलीस कोठडीत बदल करत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार 23 जुलैपर्यंत नितेश राणेंसह 18 समर्थकांची रवानगी न्यायलीन कोठडीत करण्यात आली आहे.
यानंतर शुक्रवारी (5 जुलै) नितेश राणे यांच्यासह 18 समर्थकांना कणकवली येथील दिवाणी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी कोर्टाने त्यांना 9 जुलैपर्यंत कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले होते.
नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बुधवारी (3 जुलै) उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की करुन, चिखलांच्या बादल्या अंगावर ओतल्या होत्या. याप्रकरणी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांनी नितेश राणे यांच्याविरोधात कुडाळ पोलिसात तक्रारी दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी नितेश राणेंच्या घराबाहेर फौजफाट्यासह हजेरी लावली. त्यावेळी दंगल नियंत्रण पथकही उपस्थित होतं. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 जुलैला नितेश राणे स्वत:हून कणकवली पोलिसात हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
कुडाळ पोलीस ठाण्यात आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध 353,342,143,148,149 या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आमदार नितेश राणे, मिलींद मेस्त्री, संदीप सावंत, निखीला आचरेकर, मामा हळदीवे, मेघा गांगण यांचा समावेश आहे.