दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई: रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उपाअभियंत्यांवर चिखलफेक करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना मनसे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी पाठिंबा दिला आहे. “नितेश राणे यांनी केलं ते योग्यच केलं. रस्ते दुर्घटनेस कारणीभूत ठरून हजारो बळी घेणाऱ्या इंजिनिअर्सवर कारवाई कधी करणार?”, असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
लाखो रुपये खाऊन इंजिनिअर्सना कळणार नसेल तर त्यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेतच समजवावे लागेल. नितेश राणे यांची सरकारने लवकरात लवकर सुटका करावी आणि कामचुकार इंजिनिअर्सवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पावित्रा घेत उपअभियंत्याला धक्काबुक्की केली. आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधण्याच्या प्रयत्न करुन, थेट हायवेवरील चिखलाने आंघोळ घातली. नितेश राणेंनी शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहिली.
मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, जागोजागी पसरलेले खडीचे साम्राज्य, तसेच सातत्याने अपघात होत असतात. त्यामुळे नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात जाऊन उप अभियंता प्रकाश शेडेकर यांची भेट घेतली. त्यानंतर आक्रमक झालेल्या राणेंनी शेडेकर यांना हाताला धरुन महामार्गाची जबरदस्तीने पाहणी करायला लावली. पाहणी झाल्यानंतर त्यांनी शेडेकर यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. एव्हढंच नव्हे तर त्यांना महामार्गाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
उपअभियंत्यावर चिखलफेक करणारे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची कोठडी 9 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. कणकवलीतील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे नितेश राणे यांना आजच्यासह 5 रात्री पोलीस कोठडीतच काढाव्या लागणार आहेत. आमदार नितेश राणे यांच्यासह समर्थकाना पोलीसांनी काल संध्याकाळी अटक केली होती. मात्र छातीत दुखू लागल्याचं कारण देत नितेश राणे हे ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. आज आमदार नितेश राणे यांच्यासह 18 समर्थकांना दुपारी कणकवली येथील दिवाणी न्यायालयात हजर केले. कोर्टाने त्यांना 9 जुलैपर्यंत कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले.
संबंधित बातम्या