गजानन उमाटे, नागपूरः एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबरोबर बहुतांश शिवसैनिक असल्याने जे जे बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) आहे, ते ते एकनाथ शिंदेंचे आहे, असं वक्तव्य भाजप नेता नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलंय. तर उद्धव ठाकरे यांचा गट आता वाटीभरच शिल्लक राहिलाय. त्यामुळे त्यांनी हट्ट सोडावा, अशा शब्दात त्यांना सुनावलं.
मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयावर दावा ठोकण्यासाठी काल एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये तुफ्फान हाणामारी झाली. शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न शिंदे समर्थकांनी केला. यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, ‘ ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यालय आहे. त्यांचा अधिकार ते घेणार. जे बाळासाहेबाचे आहे ते सर्व शिंदेचे आहे. उद्धव ठाकरे यांचा वाटी एवढा ग्रुप राहिला त्यांनी हट्ट सोडला पाहिजे. जिथे जिथे बाळासाहेब बसायचे तिथे शिंदेचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेले जे कार्यालयात गेले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं. कालची घटना हा दादागिरीचा प्रकार आहे. ही
मस्ती सत्तेच्या जोरावर सुरू आहे, जनतेनेच ती उतरवली पाहिजे… शिंदे गटाला कार्यालय असणे वावगे नाही… त्यामुळे त्यांना हवे होते तर दुसरे कार्यालय बघायचे होते…
नितेश राणेंच्या वक्तव्याला उत्तर देताना दानवे म्हणाले, ‘ हे वाटीभर असलेले शिवसैनिकच नाकात पाणी आणतील….
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही कालच्या घटनेवरून शिंदे गटावर टीका केली. ते म्हणाले, ‘ भाजपासारखा अहंकार शिंदे गटाला चढला आहे. दुसऱ्याच्या घरात जाऊन सामान बाहेर फेकलं तर कसं वाटेल तसंच आता ठाकरे गटालाही वाटत आहे. मात्र सध्या शिंदे गटाकडून अतिक्रमण केलं जातंय.