सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील नाईक आणि राणे कुटुंबातील वाद आज पुन्हा उफाळून आला. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यात भरसभेत बाचाबाची (Nitesh Rane Vaibhav Naik Ruckus) झाली. खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री, शिवसेना नेते उदय सामंत यांच्या मध्यस्थीमुळे वादावर पडदा पडला.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या निमित्ताने आज नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते दीपक केसरकर हे एकाच व्यासपीठावर आले होते.
आमदार वैभव नाईक यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तसंच पालकमंत्री उदय सामंत यांच्याही अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या अभिनंदन ठरवाला अनुमोदन दिलं.
शिवसेना नेते दीपक केसरकर पालकमंत्री असताना सर्वाधिक निधी सिंधुदुर्गात आला. त्यामुळे केसरकरांचं अभिनंदन करावं, असा ठरावही वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत मांडला.
सभेच्या सुरुवातीलाच नारायण राणेंनी दीपक केसरकर यांना टार्गेट केलं. केसरकरांनी गेल्या पाच वर्षात विकासाचं राजकारण केल्याचा आरोप राणेंनी केला. केसरकरांच्या अभिनंदन ठरावावरुन नियोजन सभेत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गोंधळ घातला.
नितेश राणे आणि वैभव नाईक हे भरसभेतच एकमेकांना भिडले. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण (Nitesh Rane Vaibhav Naik Ruckus) झालं. मात्र नारायण राणे आणि उदय सामंत यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणावर पडदा टाकला.