सिंधुदुर्ग : उपअभियंत्यावर चिखलफेकप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना काल ओरोस जिल्हा कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर नितेश राणेंसह सर्व 18 जण रात्री 11 च्या सुमारास सावंतवाडी कारागृहातून बाहेर आले. जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी 10 जुलै रोजी त्यांना जामीन मंजूर केला.
…म्हणून ही पावले उचलली
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नितेश राणे म्हणाले, “संघर्षात पाठिंबा दिला त्यांचे आभार. त्यांच्या पाठिंब्यामुळेच ऊर्जा मिळाली. लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी असते. लोकांची प्रामाणिक सेवा हा हेतू असतो. आम्ही जनतेता बांधील म्हणून ही पावले उचलली”
353 चा वापर कवच म्हणून करा शस्त्र म्हणून नको
“कुणाला मारणे, हल्ला करणे ही आमची संस्कृती नाही. अधिकाऱयांनी प्रामाणिकपणे काम केले तर अशी आंदोलने होणार नाहीत. जनेतेचे सर्व पर्याय संपतात तेव्हा अशा पद्धतीची आंदोलने, उद्रेक होतात. अधिकाऱयांनी 353 कलमाचा वापर कवच म्हणून करावा, शस्त्र म्हणून करू नये” असे आवाहन नितेश राणे यांनी केलं.
पुढच्या टर्ममध्ये लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा संधी मिळाली तर 353 कलममध्ये बदल करण्याची मागणी करणार, असंही त्यांनी सांगितलं.
‘अपना टाईम आयेगा’
भाजप आणि शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांनी आमचे आंदोलन योग्य होते असे सांगितले. आम्ही लोकांची सेवा करीत राहणार. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना नितेश राणे जेलमध्ये बसतानाचा फोटो दाखवा असे स्वप्न पडत होते. मी त्यांना सांगेन की जिल्ह्याच्या उन्नतीचे स्वप्न पाहा. मी केसरकरांना एवढंच सांगेन अपना भी टाईम आयेगा, असं नितेश राणे म्हणाले.
चंद्रकांतदादा-राणेंचे चांगले संबंध
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आणि राणेसाहेबांचे चांगले संबंध आहेत. ते ज्येष्ठ मंत्री आहेत. ते म्हणतात आपण असे बोललो नाही. तपासात सिद्ध होईल नेमके काय झाले. मला या विषयावर काही बोलायचे नाही, असं म्हणत नितेश राणेंनी शांत राहणं पसंत केलं.
माझ्या मुलाला वाचवा असा फोन नारायण राणेंनी केला होता. मात्र मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना नितेश राणेंवर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
आज बाळासाहेब असते, तर शाबासकी दिली असती
न्यायालयाने माझा प्रचार सोपा केलाय. मी प्रत्येक रविवारी कणकवलीत येईन. आज बाळासाहेब असते तर त्यांनी सांगितले असते शाब्बास तू चांगले काम केले आहेस, असं नितेश राणे म्हणाले.
आमचा वचक उद्यापासून दिसेल. गप्प बसणार नाही. म्हणून लगेच कुणाला मारायला जाणार नाही. आम्ही लोकांशी बांधील आहोत. आम्ही अधिकाऱ्यांच्या कामावर लक्ष देऊ. उद्या महाराष्ट स्वाभिमानाची पुढची दिशा कळेल, असं नितेश राणेंनी सांगितलं.
संबंधित बातम्या