नागपूर : माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त देशभरात विविध कार्यक्रम पार पडत आहेत. नागपुरातही टेन्को रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस नेता कन्हैया कुमारने (Kanhaiya Kumar) या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी बोलताना कन्हैया कुमारही केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agency) मुद्द्यावरुन भाजपवर आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. जे या देशाला विकत आहेत, त्यांना शुद्धीवर आणण्याची गरज आहे. ज्या लोकांना या देशाला वाचवायचं आहे ते लोकच देश विकणाऱ्यांना शुद्धीवर आणतील, असा इशारा त्याने केंद्र सरकारला दिलाय. तसंच केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापर होत असल्याचा आरोप करत, ‘मला तर भीती वाटत आहे की कधी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधातही CBI चा वापर होईल’, असा टोलाही त्याने भाजपला लगावलाय.
कन्हैया कुमार म्हणाला की, केंद्रीय तपास यंत्रणा देशाच्या सुरक्षेसाठी आहेत. आताचे सरकार आपल्या खुर्चीच्या सुरक्षेसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करतेय. विरोधी पक्षांना दाबण्यासाठी त्यांचा वापर केला जातोय. सरकारच्या दोस्तांना मात्र सूट मिळत आहे. मला तर भीती आहे की कधी नितीन गडकरी यांच्या विरोधातही सीबीआयचा वापर होईल, अशी खोचक टीका कन्हैया कुमारने भाजप नेतृत्वावर केलीय.
यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये कन्हैया कुमार काँग्रेसच्या सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोपाला उपस्थित होता. त्यावेळी त्याने ‘मी पंतप्रधानांसारखा नापास झालो नाही. माझं मार्कशीट पाहू शकता. देशातील एक व्यक्ती अर्ध्या रात्री येऊन टीव्हीवर काही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भलं होणार आहे’, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदींवर केली होती. देशाच्या नावावर मित्रांचं भलं करण्याचं काम सुरु आहे. आतापर्यंत कधीड डिझेल 100 रुपये लिटर झालं नाही. महागाई आकाशाला पोहोचली आहे. गांधींजींची हत्या करणारे लोक आज देश विकायला निघाले आहेत. पंतप्रधान म्हणजे देश आहे का? पंतप्रधानांबद्दल काही बोललं की देशद्रोही ठरवलं जातं. जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय ते कसं समजणार? असा खोचक सवालही कन्हैया कुमारने पुण्यात विचारला होता.
तसंच अग्नीपथ योजनेवरुनही कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या, असा आक्रमक पवित्रा त्याने घेतला होता. इतकंच नाही तर अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी, सरकारने लॉलीपॉप दाखवायचं बंद करावं. सैन्यात जाणारे गरीब, शेतकरी, कष्टकरी असतात, राजकीय नेत्यांची मुलं सैन्यात जात नाहीत, अशी घणाघाती टीका कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदींवर केली होती.