पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील नागरिकांची अनेक घरांवर बुल्डोजर चालल्यानंतर आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थानिक रहिवाशांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधत त्याच्या घरांवर झालेल्या कारवाईची माहिती घेतली. परिसरातील अबालवृद्ध आणि महिलांशी संवाद साधला. दलित महिलांशी करण्यात आलेलं गैरवर्तन ऐकून तीव्र दु:ख झालं, अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली आहे. इतकंच नाही तर पुणे महापालिका आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावरही राऊत यांनी जोरदार निशाणा साधलाय. (Nitin Raut criticizes Pune Municipal Corporation and Mayor Murlidhar Mohol)
आंबिल ओढ्याच्या ठिकाणी घडलेला प्रकार दुर्दैवी, त्याचा निषेध करतो. कोरोना काळात प्रशासनाने जी कारवाई केली त्याबाबत महापालिकेला लाज वाटली पाहिजे होती. एवढं सगळं होत असताना महापौर काय झोपले होते का? नागपुरात जर असं घडलं असतं तर आपण जेसीबीखाली झोपलो असतो, असं आक्रमक मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. दलित समाजावर अन्याय झाला आहे. घटनेची चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी आमच्या स्त्रियांना हात लावला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केलीय.
पुणे शहरातील आंबिलओढा परिसरातील रहिवाशांची भेट घेऊन पुणे मनपाने केलेल्या बेकायदेशीर कारवाईची माहिती घेतली. या परिसरातील आबालवृद्ध आणि महिला यांच्याशी संवाद साधला.दलित महिलांशी करण्यात आलेले गैरवर्तन ऐकून तीव्र दुःख झाले! pic.twitter.com/3Opey01TYJ
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) June 29, 2021
दरम्यान, स्थानिकांकडून अजित पवार यांच्या जवळच्या बिल्डरकडून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत असल्याबाबत पत्राकारांनी नितीन राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर मात्र नितीन राऊत यांना उत्तर देता आलं नाही. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केलीय.
महापालिका प्रशासनाने अतिक्रमण पाडण्याचा कुठलाही आदेश दिला नव्हता. पर्यावरण विभागाचं ना हरकत प्रमाणपत्रही घेण्यात आलं नव्हतं. जून, जुलैमध्ये कारवाई करु नये, असे कोर्टाचे आदेश असताना पोलिसांनी कारवाईला संरक्षण कसं दिलं? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. पावसाळ्यात कुणालाही बेघर करायचं नाही असे निर्देश असतानाही कारवाई झाली. कोण-कुणाच्या पाठीमागे आहे हे पाहता संबंधित बिल्डरवर कारवाई व्हावी. अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाणार असल्याचा इशाराही आंबेडकर यांनी दिलाय. गृहमंत्री यात काही कारवाई करतील असं वाटत नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षाही नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या विषयाची दखल घ्यावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केलीय.
संबंधित बातम्या :
आंबिल ओढ्यातील नागरिकांशी संवाद, सुप्रिया सुळेंसमोरच अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा
Nitin Raut criticizes Pune Municipal Corporation and Mayor Murlidhar Mohol