अहमदनगर : अहमदनगर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना निलंबित करण्यात आलंय. पक्षाचा आदेश न पाळल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली. शिवाय अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांचीही पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीने ही कारवाई करुन नगरसेवकांना बळीचा बकरा बनवलंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण, भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडील अरुण जगताप यांना अभय देण्यात आलंय. फक्त दिखाव्यासाठी ही कारवाई करण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडील अरुण जगताप यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही. आम्ही भाजपला विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला असल्याचं संग्राम जगताप यांनी सांगितलं होतं. त्यामुळे नगरसेवकांवर कारवाई करुन नगरसेवकांना बळीचा बकरा बनवल्याची शहरात चर्चा आहे.
अरुण जगताप आणि त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे तर दोघांना अभय दिलं नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. संग्राम जगताप हे विधानसभा, तर त्यांचे वडील अरुण जगताप हे स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेचे आमदार आहेत.
अहमदनगर राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक आणि शहर जिल्हाअध्यक्ष नावे
माणिकराव विधाते- शहर जिल्हाअध्यक्ष
1) सागर बोरुडे
2) मीनाक्षी चव्हाण
3) दीपाली बारस्कर
4) संपत बारस्कार
5) विनीत पाऊलबुद्धे
6) सुनील त्रंबके
7) खान समद वहाब
8) ज्योती गाडे
9) शोभा बोरकर
10) कुमार वाकळे
11) रुपाली पारगे
12) अविनाश घुले
13) गणेश भोसले
14) परवीन कुरेशी
15) शेख नजीर अहमद
16) प्रकाश भागानगरे
17) शीतल जगताप
18) मीना चोपडा
महापौर निवडणुकीत नेमकं काय झालं?
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं. त्यामुळे भाजपचे बाबा वाकले महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली.