बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशावर पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. रणजितसिंह यांनी त्यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा आशीर्वाद घेऊनच भाजपात प्रवेश केलाय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण आम्ही विजयसिंहांवर कारवाई करण्याच्या भानगडीत पडणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलंय.
विजयसिंह मोहिते पाटलांनी ज्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. ते पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे आम्ही स्वच्छपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मी सहकाऱ्यांचा सन्मान करतो. मोहिते पाटील यांना राज्याच्या साखर संघाचे अध्यक्ष, देशाच्या साखर संघावर प्रतिनिधित्व दिलं. पण त्यांच्या मनात काही वेगळा विचार आला, असं शरद पवार म्हणाले.
भाजपात सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं इनकमिंग सुरु आहे. यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. आम्हाला उमेदवारांची कमतरता नाही. भाजपने असं ठरवलेलं दिसतंय की बाहेरच्या लोकांना उमेदवारी द्यायची. आधी हा पक्ष काही विचारांची बांधिलकी माणायचा, अशी टीकाही शरद पवारांनी केली.
एनडीएचं सरकार येणार नाही असंही शरद पवार म्हणाले. मागील निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या. जाणकारांच्या मते, यावेळी त्यातील 40-45 जागा कमी होतील. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेसला खुप कमी जागा होत्या. यावेळी या तीन राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. तिथे भाजपच्या अर्ध्याहून जागा कमी होतील. त्यामुळे उत्तर भारतातच भाजपच्या 80-90 जागा कमी होतील, असा अंदाज शरद पवारांनी वर्तवला.
दरम्यान, काँग्रेसचे सल्लागार यांनी पाकिस्तानची बाजू ओढत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देण्यास शरद पवारांनी नकार दिला. पण इतर मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी वारंवार एअर स्ट्राईकचा उल्लेख केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.