पुणे: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या बंडावर कायम आहेत. त्यामुळे आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार (maha vikas aghadi) कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या बंडाला बळ देणारी विधाने भाजपमधून केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी एक मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा युतीचा प्रस्ताव आला तर त्याचा विचार करू, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटील यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. पाटील हे शिंदे यांच्या बंडाला बळ देत असल्याचं या विधानातून ध्वनीत होत आहे. तसेच शिंदे यांना युतीचा प्रस्ताव पाठवा असं तर पाटील यांना शिंदे यांना सूचवायचं नाही ना? असाही सवाल यावेळी केला जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हे विधान केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांचं बंड हा शिवसेनेच्या अंतर्गत कलहाचा प्रश्न आहे. त्याच्याशी भाजपचा काहीच संबंध नाही. शिवसेना त्यांचा प्रश्न सोडवेल. मात्र, यामागे भाजप नक्कीच नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. दोन मोठ्या निवडणुकीत आमच्या पडद्यामागच्या कलाकारांनी चांगली कामगिरी बजावली. ऑफिसच्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता. त्यासाठी मी बाहेर होतो, असंही त्यांनी सांगितलं.
विधानसभेच्या नियमानुसार दोन तृतियांश आमदार सोबत असतील तर नवा गट तयार करता येतो. शिंदे यांच्याकडे दोन तृतियांश मते आहेत की नाही हे पाहावं लागेल, असं सांगतानाच शिंदे यांच्याकडून युतीचा प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करू, असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचे सर्वच पक्षात मित्रं आहेत. त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. आम्ही सरकारमध्ये एकत्र असताना एक सहकार्य करणारा मंत्री, संवाद साधणारा मंत्री आणि कार्यकुशल मंत्री अशीच त्यांची प्रतिमा होती. मला त्यांच्यासोबत काम करायला मिळालं. पीडब्ल्यू खातं आमच्या दोघात वाटलेलं होतं. मराठा आरक्षण समितीचा मी अध्यक्ष होतो. त्या समितीत शिंदे होते. त्यावेळी ते हिरहिरीने मुद्दे मांडायचे, असंही त्यांनी सांगितलं.