औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावल्यानंतर काँग्रेसवर शहरातून (No Congress in Aurangabad City) हद्दपार होण्याची वेळ ओढवली आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे शहरात आता पक्षाच्या वाट्याला मतदारसंघच उरलेला नाही.
औरंगाबाद हा एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत याच औरंगाबादमधून काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड हे एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून पराभूत झाले. झांबड फक्त पराभूतच झाले नाहीत, तर त्यांच्यासह काँग्रेसवर डिपॉझिटही जप्त होण्याची नामुष्की ओढावली होती.
यावेळी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिलेल्या रमेश गायकवाड यांचा अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाला आहे. त्यामुळे लढतीआधीच या मतदारसंघातून काँग्रेसचा पत्ता कट (No Congress in Aurangabad City) झाला.
धीरज देशमुखांची भावनिक साद, रितेश-जेनेलियासह देशमुख कुटुंब भारावलं
आघाडीमध्ये काँग्रेसने औरंगाबाद पूर्व मतदारसंघात समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे, तर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातून काँग्रेस हद्दपार झाली आहे.
नाही म्हणायला, औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसला अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करता येऊ शकतो. सिल्लोडमधून काँग्रेसकडून खैसर आझाद मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यानंतर शिवसेनेच्या तिकीटावर ते सिल्लोडमधून मैदानात उतरले आहेत.
सत्तार यांच्याविरोधात सर्वपक्षीयांनी दंड थोपटले आहेत. अगदी शिवसेनेतील नाराजांनीही उघड भूमिका घेतली आहे. मात्र ही बंडखोरी खैसर आझाद यांच्या कितपत पथ्यावर पडणार, हा प्रश्नच आहे. त्यामुळे औरंगाबादेत आता काँग्रेचं काय होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.