अमरावती : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीची साथ सोडली आहे. पण त्यांनी साथ सोडल्याने मतदानावर काहीही फरक पडणार नाही. कारण, लोकसभेला मुस्लीम समाजाची मतं वंचितला मिळालीच नव्हती, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar AIMIM alliance) यांनी केलंय. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने सत्तासंपादन आणि प्रबोधन मेळाव्यात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar AIMIM alliance) पत्रकारासोबत बोलत होते. यावेळी त्यांनी एमआयएमला भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
एमआयएमसोबत युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर फार परिणाम पडणार नाही. गेल्या निवडणुकीत मुस्लीम समाजाने वंचित आघाडीला मतदान केलं नव्हतं, असं सांगत युती तुटल्याची कबुली प्रकाश आंबेडकरांनी दिली. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमलाही आहे, असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी शुभेच्छाही दिल्या.
लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लीम समाजाचा आत्मविश्वास वाढल्याने हा मुस्लीम समाज वंचितसोबत आहे. त्यामुळे विधानसभेच्या 25 जागा मुस्लीम समाजातील उमेदवारांना देणार, अशी घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली.
दरम्यान, भाजपात सुरु असलेल्या इनकिंगवर प्रकाश आंबेडकरांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलं. वंचितची सत्ता आल्यानंतर आपण विस्थापित होऊ या भीतीने सर्व जण भाजपात जात आहेत, असं ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांना वाटतंय की वंचित सत्तेवर आली तर आपण विस्थापित होऊ. सर्व प्रस्थापित आता भाजपच्या वाटेवर आहेत. भाजपात जाऊन वंचितला थांबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझी अपेक्षा आहे की आम्ही किल्ला लढवू आणि तो सर करु, असंही ते म्हणाले.