महायुती नको, अपक्ष लढू; आमदाराच्या मागणीमुळे अजितदादा यांच्यासमोर मोठा पेच

| Updated on: Jul 26, 2024 | 4:56 PM

आम्ही आयुष्यात जे घडलो ते पवार साहेबांमुळे घडलो. त्यामुळे स्वगृही परतण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र, पक्षाकडे काही मागणी आहेत. पक्षाने आमच्यासोबत न्याय करावा.

महायुती नको, अपक्ष लढू; आमदाराच्या मागणीमुळे अजितदादा यांच्यासमोर मोठा पेच
ajit pawar (9)
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. परभणी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परभणीमधील एका कार्यक्रमात बाबाजानी दुर्रानी यांच्या मुलाने त्यांच्या हजारो समर्थकांसह हजेरी लावली. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे पाथरी विधानसभेतून बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवार मिळावी अशी मागणी केली. विशेष म्हणजे कालच बाबाजानी दुर्राणी यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती आणि आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांच्या समर्थकांनी उपस्थिती लावली.

बाबाजानी दुर्रानी हे विधान परिषदेतील आमदार आहेत. जुलै 2024 मध्ये त्यांचा कार्यकाल संपला. त्यांना पुन्हा संधी न देता त्यांच्याकडे परभणीचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. तर, त्यांचे विरोधक विटेकर यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली. त्यामुळे बाबाजानी दुर्रानी हे नाराज झाले होते. अशातच त्यांनी काल जयंत पाटील यांची भेट घेऊन अजितदादा यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता आणि आज त्यांच्या समर्थकांनी शरद पवार गटाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी बाबाजानी दुर्रानी यांचा मुलगा जुने दुरानी देखील उपस्थित होते.

आम्ही आयुष्यात जे घडलो ते पवार साहेबांमुळे घडलो. त्यामुळे स्वगृही परतण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र, पक्षाकडे काही मागणी आहेत. पक्षाने आमच्यासोबत न्याय करावा. पाथरी विधानसभेतून बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवारी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. पक्षाने ही जबाबदारी दिल्यास आम्ही घरवापसी करायला तयार आहोत. मात्र, पक्षाने संधी दिली नाही तर अपक्ष लढू मात्र महायुतीतून लढणार नाही असे दुर्रानी यांनी स्पष्ट केले.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षासोबत विचार विनिमय करून या जागेबाबत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. विधानसभा जागेची मागणी ही माझ्यासाठी नाही तर आमदार दुर्रानी साहेबांसाठी करण्यात आली आहे. पक्षाने सहकार्याची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासाठी घर वापसी करायला तयार आहे असे त्यांनी सांगितले.