नागपूर | 13 डिसेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टानं नार्वेकर यांना या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलीय. त्यामुळे नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असतानाही नार्वेकर दर रोज सुनावणी घेत आहेत. अध्यक्ष नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाची नियमित सुनावणी घेऊन साक्ष संपवली. आता सोमवारपासून 3 दिवस अंतिम सुनावणी आहे. म्हणजेच 18 ते 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल आणि त्यानंतर नार्वेकर अंतिम निकाल लिहिण्यास सुरुवात करतील. मात्र, निकाल देण्याआधीच म्हणजे 31 डिसेंबरच्या आत अध्यक्ष राहुल नार्वेकरच राजीनामा देतील आणि हे प्रकरण पुन्हा लांबवलं जाईल अशी गंभीर शंका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलीय.
शिवसेना अपात्र प्रकरणावर निकाल देण्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर राजीनामा देऊ शकतात, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. माझ्या ऐकण्यात जे आले आहे तेच मी सांगितले आहे. सत्य हेच आहे की जर निकाल दिला तर एकनाथ शिंदे अडचणीत येतील. एकनाथ शिंदे अडचणीत आले तर सरकार अडचणीत येईल. त्यामुळे सगळ्यांचीच अडचण होऊन जाईल. त्यामुळे यातला सुवर्णमध्ये हाच ठरेल की विधानसभा अध्यक्षांनीच राजीनामा द्यावा. जेणेकरून ही सगळी प्रक्रिया पुढे ढकलली जाईल आणि निर्णय लागणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी शरद पवारांबद्दल जे काही विधान केले, वक्तव्य केले ते अत्यंत चुकीचे आहे. ज्याच्यासोबत काम केलं, लहानाचे मोठे झाले त्यांच्यावर सत्तेच्या लालसेपोटी अशी टीका करणे हे नियमांना, संकेतांना धरून नाही अशी टीकाही त्यांनी अजित पवार यांच्यावर केली.
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. पण, एक निश्चित आहे की दहा महिने पुण्याची जागा रिक्त राहिली. तिथे निवडणूक घेतली गेली नाही. कारण सरकार घाबरलेले आहे. सरकारला भीती आहे जे काही इतर राज्यांमध्ये घडले आहे. जो विजय त्यांना इतर राज्यात मिळाला तेच समीकरण इथे होईल याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे निवडणुका घेतल्या जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
परंतु, रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर अजितदादा आणि शिंदे गटाने पलटवार केलाय. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ‘आंदोलन करणे हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही ते केलं पाहिजे. परंतु, आंदोलन करताना पाहून आपल्या एक वेगळ्या मागण्या तिथं मांडायच्या. आपण नाही पण तुम्ही इथं आले पाहिजे म्हणजे सरकारने तुमच्यासमोर आलंच पाहिजे हा जो तुमचा अट्टाच असतो तो बरोबर नाही, अशी टीका केलीय.
तुम्ही आमदार आहात तुमच्याबरोबर लोकं घेऊन तुम्ही सीएमला भेटू शकले असता. त्यांना बोलू शकता. तुम्हाला अधिकार दिला आहे घटनेने. पण ते न करता माझ्यासमोर मी सर्वांना नमू शकतो ही जी गुर्मी आहे ती कुणाची नसावी. आम्हाला विरोधक राहिले नाहीत. त्यांचा फोकस आऊट झालाय. राजकारणात रोहीत पवार नावाचा नवा ज्योतिष आलाय असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावर बोलताना अध्यक्ष हे अर्धन्यायीक भूमिकेत आहेत. त्यावर मी बोलणं योग्य नाही. ते अधिवेशनात बोलले मी त्यांना अधिवेशनात उत्तर देईल. काल जी मीटिंग झाली. सभा झाली. साहेबांचे भाषण झालं त्यानंतर काही झालं. रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दल काय बोलले ते मला माहित नाही. पण, मी काही तेवढं ज्योतिष्य वगैरे काही बघितलं नाही, असा टोला लगावलाय.