मुंबईः शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविषयी मोठी अपडेट आहे. राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. शिवडी कोर्टाने हे वॉरंट काढलंय. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात कोर्टाने ही सुनावणी घेतली. येत्या 24 जानेवारी रोजी या प्रकरणी कोर्टात पुढील सुनवाणी होणार आहे.
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे. शिवडी दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे. संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखात सोमय्या यांच्याविरोधात शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. 100 कोटींच्या या घोटाळ्याच्या आरोपामुळे आपली बदनामी झाली आहे, असा दावा मेधा सोमय्या यांनी केला होता.
दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्ररकणी संजय राऊतांचा ईडीमार्फतही तपास सुरु आहे. याच प्रकरणी १०२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत सध्या जामीनावर आहेत. त्यांचा हा जामीन रद्द करण्यासाठी ईडीमार्फत आतापर्यंत चार वेळा खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली. मात्र जामीन रद्द झालेला नाही.
आजदेखील न्यायाधीश नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर ईडीने याचिका दाखल केली होती. मात्र न्यायाधीश बोरकर हे आज उपस्थित नसल्यामुळे यासंबंधीची याचिका पुढे ढकलण्यात आली आहे.